Satara: आंतरराष्ट्रीय कंपनीच्या गोदामातून बारा लाखांच्या मुद्देमालाची चोरी, दोघेजण गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 07:26 PM2024-02-05T19:26:36+5:302024-02-05T19:26:59+5:30

शिरवळ : शिरवळ येथील पळशी रोडवर असणाऱ्या कुरिअर सेवा पुरविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या गोडाऊनमधून मोबाईलसह १२ लाख २० हजार ९५९ ...

Shirwal police nabbed two thieves, seized valuables worth 12 lakhs | Satara: आंतरराष्ट्रीय कंपनीच्या गोदामातून बारा लाखांच्या मुद्देमालाची चोरी, दोघेजण गजाआड

Satara: आंतरराष्ट्रीय कंपनीच्या गोदामातून बारा लाखांच्या मुद्देमालाची चोरी, दोघेजण गजाआड

शिरवळ : शिरवळ येथील पळशी रोडवर असणाऱ्या कुरिअर सेवा पुरविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या गोडाऊनमधून मोबाईलसह १२ लाख २० हजार ९५९ रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारणाऱ्या कंपनीच्या गोडाऊन कर्मचाऱ्यासह चालकाची टोळी गजाआड केली. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी पदभार घेताच गुन्हा उघडकीस आणत गुन्हेगारांना दणका दिला आहे. श्रीकांत घनवट, राजेंद्र लक्ष्मण सांगळे असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ हद्दीतील पळशी रोडवर एका अपार्टमेंटमध्ये कुरिअर सेवा पुरविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे गोदाम आहे. यामध्ये श्रीकांत विनोद घनवट (वय २२, रा. राजापूर ता. खटाव) हा साहित्य लोडर म्हणून कार्यरत आहे. ३१ ऑगस्ट २०२३ ते १८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये चाकण, पुणे येथील कंपनीमधून शिरवळ, कळंबा, कोल्हापूर मार्गावर आलेले महागडे मोबाईलसह साहित्य असा १२ लाख २० हजार ९५९ रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कंपनीचे मयूर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, शंकर पांगारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय धुमाळ, पोलिस अंमलदार सचिन वीर, जितेंद्र शिंदे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, सुरज चव्हाण यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. कर्मचारी श्रीकांत घनवट, चालक राजेंद्र लक्ष्मण सांगळे (वय ३९, रा. कर्हेवाडी, ता. कर्हेवडगाव, ता. आष्टी, जि.बीड) यांच्या टोळीला ताब्यात घेतले. संबंधितांकडून कौशल्याने गुन्ह्यातील ४१ मोबाईल हस्तगत करीत ६ लाख ७० हजार ३८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संबंधितांना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय धुमाळ तपास करीत आहे.

गुन्हेगारांना बसलाय झटका

शिरवळचे नूतन पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी पदभार स्वीकारताच पहिला झटका दिला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पहिलाच मोठा गुन्हा मोठ्या शिताफीने शिरवळ पोलिसांनी उघडकीस आणत गुन्हेगारांना जोरदार झटका दिला आहे. दोघांना बुधवार, दि. ३१ जानेवारी रोजी अटक केली. त्यानंतर तपास करुन पाच दिवसांत विविध ठिकाणांहून ४१ चोरीचे मोबाईल हस्तगत केले.

Web Title: Shirwal police nabbed two thieves, seized valuables worth 12 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.