Satara: किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी

By सचिन काकडे | Updated: February 26, 2025 16:12 IST2025-02-26T16:11:14+5:302025-02-26T16:12:17+5:30

राज्यभरातील हजारो भाविक नागेश्वरचरणी लीन

Shiv devotees throng to see Lord Mahadev on a high hill near Fort Vasota in Satara district | Satara: किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी

Satara: किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी

सातारा : विस्तीर्ण पसरलेला कोयना जलाशय, घनदाट अरण्य, पक्ष्यांचा किलबिलाट, नागमोडी पायवाटा अन् दरदरून घाम फोडणारा सह्याद्री अशा चित्तथराक गिर्यारोहणाचा अनुभव घेत राज्यभरातील हजारो शिवभक्त बुधवारी नागेश्वराच्या चरणी लीन झाले. किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेल्या या महादेवाचे दर्शन घेतानाच भक्तांमध्ये चैतन्य तर संचारलेच, शिवाय भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगमही पाहायला मिळाला. 

सातारा जिल्ह्यात सर्वच सण-उत्सव मोठ्या धामधुमीत साजरे केले जातात. महाशिवरात्र हा त्यापैकी एक उत्सव. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या महादेव मंदिरांमध्ये बुधवारी महाशिवरात्र धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेले नागेश्वराचे मंदिर राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी हजारो भाविक महाशिवरात्रीला नागेश्वरचरणी नतमस्तक होत असतात. 

जल व जंगल सफारीचा थरारक अनुभव 

कोयनेच्या घनदाट अरण्यात हे मंदिर असल्याने येथे पोहोचताना भक्ती अन् शक्तीचा अक्षरश: कस लागतो. यंदादेखील हजारो भाविकांनी जल व जंगल सफारीचा थरारक अनुभव घेत नागेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. भक्तांना दर्शन घेता यावे, म्हणून तापोळा, बामणोली, मुनावळे येथून बोटींची व्यवस्था करण्यात आली होती.

वन विभागाकडून सुरक्षेची पुरेपूर काळजी

आज, सकाळी ६ वाजल्यापासूनच भाविक नागेश्वराच्या दिशेने रवाना झाले. दर्शनासाठी मंदिरापासून दूर अंतरापर्यंत भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तांनी नागेश्वराचे दर्शन घेत परतीचा प्रवास निर्विघ्नपणे पार पाडला. वन विभागाकडून भक्तांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली होते. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने नागेश्वराचा सुळका भक्तिरसात न्हाऊन निघाला.

Web Title: Shiv devotees throng to see Lord Mahadev on a high hill near Fort Vasota in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.