शिवजयंती उत्साहात : छावा ग्रुपकडून मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 03:03 PM2019-02-19T15:03:47+5:302019-02-19T15:06:13+5:30
सातारा शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यायतही अनेक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.
सातारा : सातारा शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यायतही अनेक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.
प्रथम अजिंक्यतारा किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यात आली. यावेळी अनेकांनी भगचवे फेटे परिधान केले होते. मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे पोवाडे तसेच छावा ग्रुपकडून मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी शिवज्योतीचे स्वागत केले. नंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात छावा दांडपट्टा ग्रुपच्या सागर लोहार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या थरारक प्रात्यक्षिकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
यामध्ये लाठीकाठी, तलवारबाजी, कुऱ्हाड, भाला फिरविणे, दांडपट्टा, हनुवटीखाली लिंबू ठेवून तलवार फिरवून ते कापणे, नारळ डोक्यावर ठेवून तो काठीने फोडणे, अग्निचक्र फिरविणे अशा अनेक साहसी खेळांनी डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांचे झांजपथकही आकर्षण ठरले.
बुक्कीने फोडले नारळ
या मर्दानी खेळामध्ये सागर लोहार या युवकाने हाताच्या बुक्कीने नारळ फोडण्याचे कसब करून दाखविले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.
झांजपथकाने वेधले लक्ष
महाविद्यालयातील कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांकडून झांजपथकाची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. या झांजपथकानेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.