शिवप्रतिष्ठानचा कऱ्हाडात निषेध मोर्चा, संभाजी भिडेंसह शेकडो धारकऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 05:46 PM2021-07-05T17:46:54+5:302021-07-05T17:49:33+5:30
Morcha SambhajiBhide Satara : हिंदू धर्मातील परंपरा व संस्कृती असलेली वारी खंडित केल्याबद्दल तसेच हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याने सोमवारी शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थानच्यावतीने शासनाचा जाहीर निषेध करीत शहरात मोर्चा काढण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्त चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसिलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.
कऱ्हाड : हिंदू धर्मातील परंपरा व संस्कृती असलेली वारी खंडित केल्याबद्दल तसेच हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याने सोमवारी शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थानच्यावतीने शासनाचा जाहीर निषेध करीत शहरात मोर्चा काढण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्त चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसिलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.
निवदेनात म्हटले आहे की, गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे होरपळून गेलेल्या राज्यात सुव्यवस्था राखण्यासाठी, कोरोना कमी होण्यासाठी सर्व जनता प्रशासनाला सहकार्य करीत आहे. प्रशासनाचे सर्व निर्बंध सचोटीने पाळत आहे. गतवर्षी आषाढी कार्तिकीच्या पायी दिंडी सोहळ्याला शासनाने बंधने घातली आणि दिंडी सोहळा रद्द केला.
एकूण परिस्थिती पाहता हिंदू बांधवांनी तो निर्णय मान्य केला. मात्र, यंदा लसीकरण हा पर्याय उपलब्ध असताना व प्रशासनाचे सर्व नियम, अटी, शर्थी पाळून काही निवडक वारकऱ्यांसह बंडातात्या कºहाडकर यांनी वारीला जाण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना प्रशासनाने स्थानबद्ध केले आहे.
पंढरपुर निवडणुकीत प्रचंड संख्येने प्रचार सभा झाल्या. पुण्यामध्ये एका राजकीय कार्यालयाचे प्रचंड संख्येत उद्घाटन झाले. मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेचे प्रचंड संख्येत उद्घाटन झाले. अनेक साखर कारखान्याच्या निवडणूका व प्रचार सभा पार पडल्या. राजकीय लोकांच्या वाढदिवसाला गर्दी होत आहे. हे सर्व व प्रशासनाला चालते. मात्र, हिंदू धर्मातील परंपरा पाळल्यास कोरोना होतो, हे शहाणपण प्रशासनाला कसे सुचते. हिंदू धर्मातील परंपरा खंडित करण्याचा शासनास कोणताही अधिकार नाही.
शासनाची प्रजेसाठी जी कामे आहे ती शासन करतच नाही. मात्र, हिंदू धर्मातील प्रथा, परंपरांना अटकाव, निर्बंध घालणे हेच शासनाचे कार्य झाले आहे. त्यामुळे शासनाचा जाहीर निषेध करत असल्याचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी दिलेल्या निवदेनात म्हंटले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहभागी झाले होते.