सातारा लोकसभेवर शिवसैनिकांचा दावा, आढावा बैठकीत केली एकमुखी मागणी
By दीपक देशमुख | Published: December 15, 2023 04:31 PM2023-12-15T16:31:09+5:302023-12-15T16:36:59+5:30
२५ वर्षांपासून युतीच्या वाटपानुसार जागा शिवसेनेकडे
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघातून गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना युतीच्या माध्यमातून लढत आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी सर्व शिवसैनिकांची एकमुखी मागणी असल्याचे मत सातारा लोकसभा मतदार संघाचे पक्ष निरीक्षक शरद कणसे यांनी व्यक्त केले. तर पुरुषोत्तम जाधव यांनीही युतीच्या वाटपात सातारा लोकसभेची जागा शिवसनेला होती आणि शिवसेनाच लढणार असल्याचे सांगितले.
सातारा लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सहा विधानसभांचा आढावा घेण्यासाठी शरद कणसे सातारा दौऱ्यावर आले होते. या आढाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमख जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, महिला आघाडीच्या शारदा जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कणसे म्हणाले, युतीच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदार संघ शिवसेनेला सोडला आहे. त्यामुळे युतीच्या पारंपरिक पद्धतीनुसर २०२४ लाही सातारा संघ शिवसेनेच्या चिन्हावर लढला जावा, अशी पक्षातील सर्व शिवसैनिकांची मागणी आहे. याचा अहवाल आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना देणार आहे. प्रत्येक पक्षातून सातारा लोकसभेसाठी मागणी होत असली तरी सर्वजण आपापल्या पक्षासाठी तशी मागणी करत आहेत. परंतू, सातारा लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाला पोषक वातावरण आहे. आतापर्यंत १५ ते १६ हजारापर्यंत सदस्य नोंदणी झाली असून आणखी ५० ते ६० हजारपर्यंत पक्ष सदस्य नाेंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत शिवसेना आग्रही आहे.
उमेदवार कोण असेल याबाबत कणसे म्हणाले, सातारा लोकसभेसाठी पक्षात अनेक ताकदीचे उमेदवार आहेत. पक्षश्रेष्ठी चांगला चेहऱ्यास उमेदवारी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फक्त पोटनिवडणुकीपुरती जागा सोडली, दावा शिवसेनेचाच
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, सातारा लोकसभा मतदार संघातून २५ वर्षंपासून शिवसेना लढत आहे. युतीच्या वाटपात हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. २०१९ च्या लोकसभेतही शिवसेनेतून माथाडी नेते नरेंद्र पाटील धनुष्यबाण चिन्हावर लढले होते. खा. उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणूक लागली. त्यावेळी सर्वानुमते ठरल्यानुसार जरी पोटनिवडणुकीसाठी ही जागा भाजपाला दिली तरी भाजपाचा हा मतदार संघ होत नाही. युतीच्या वाटपात ही जागा शिवसेनेचीच असून शिवसेनाच लढणार, असा दावा पुरुषोत्तम जाधव यांनी केला.