वाईमध्ये वेळेत बिलवाटप होत नसल्याची शिवसेनेची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:33+5:302021-08-13T04:44:33+5:30

वाई : शहर व तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात येणारी मासिक व व्दिमासिक बिले ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास उशीर ...

Shiv Sena complains that bills are not being distributed in time in Wai | वाईमध्ये वेळेत बिलवाटप होत नसल्याची शिवसेनेची तक्रार

वाईमध्ये वेळेत बिलवाटप होत नसल्याची शिवसेनेची तक्रार

googlenewsNext

वाई : शहर व तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात येणारी मासिक व व्दिमासिक बिले ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास उशीर होत आहे. उशिराचा भुर्दंड ग्राहकांना बसत असल्याने वाई तालुका शिवसेनेच्यावतीने उपतालुकाप्रमुख विवेक भोसले यांच्या नेतृत्वाखाली बिले वाटप करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध लेखी तक्रार करण्यात आली आहे.

याबाबत विद्युत वितरण कंपनीचे वाई विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांना शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्युत वितरण कंपनीच्यावतीने वाई व बावधन येथील ग्राहकांना दरमहा विद्युत बिले बारामती येथील ठेकेदार परिमल जगताप यांच्यामार्फत घरपोच केली जातात. या बिले वाटपात ठेकेदार उशीर व जाणूनबुजून दिरंगाई करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना विद्युत वितरण कंपनीच्या तत्पर वीजबिल भरणा योजनेचा फायदा घेता येत नाही तसेच वीज ग्राहकांना प्रत्येक महिन्याला २० ते १०० रुपयांपर्यंत अथवा त्यापेक्षा जास्त रकमेचा दंड भरावा लागत आहे.

वाई शहरातील मीटर रिडींग दर महिन्याला दि. ३ ते ५ तारखेपर्यंत घेतले जाते. तर बिले ७ तारखेला तयार करून छापली जातात व त्यांचे वाटप ८ तारखेपासून न होता, तत्पर वीजबिल भरण्याची तारीख उलटून गेल्यावर म्हणजे १६ तारखेनंतर तर अनेकदा २० ते २२ तारखेच्या पुढे केले जात आहे, ही बाब गंभीर आहे. बावधन गावात दर महिन्याला १६ ते १८ तारखेपर्यंत मीटर रिडींग घेतले जाते व तत्पर वीजबिल भरणा दि. ३० पर्यंतचा असून, ही बिले पुढील महिन्याच्या १ तारखेनंतर वाटप केली जातात. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल भरण्यास उशीर होतो. ही बाब गंभीर असून, वाई तालुक्यातील अन्य गावांमध्येही हीच परिस्थिती आहे. संबंधित ठेकेदाराची विद्युत बिले वाटपाबाबत चौकशी करून ग्राहकांना वेळेत बिले मिळतील, याबाबतची व्यवस्था कंपनीने करावी.

संबंधित ठेकेदाराने दर महिन्याला योग्यवेळेत ग्राहकांना बिले दिली नाहीत तर संबंधित ठेकेदाराविरुद्ध शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. यानंतर होणाऱ्या परिणामाला ठेकेदार व विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर शिवसेना उपतालुकाप्रमुख व बावधन ग्रामपंचायतीचे सदस्य विवेक भोसले, शहरप्रमुख गणेश जाधव, किरण खामकर, नितीन पानसे, माजी शहरप्रमुख योगेश चंद्रस, उपशहरप्रमुख सोमनाथ अवसरे, पश्चिम भाग विभागप्रमुख आशिष पाटणे, अनिकेत चव्हाण यांच्या सह्या आहेत. ठेकेदाराला वेळेबाबत शिस्त न लावल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Web Title: Shiv Sena complains that bills are not being distributed in time in Wai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.