शिवसेना शिंदेंची; साताऱ्यात शिवसैनिकांची फटाकेबाजी
By नितीन काळेल | Published: January 10, 2024 09:50 PM2024-01-10T21:50:36+5:302024-01-10T21:53:24+5:30
अध्यक्षांच्या निकालाचे स्वागत : महायुतीत खुशी; आघाडीत नाराजी
सातारा : राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडविणाऱ्या शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजुने दिल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला. तसेच अध्यक्षांचे निर्णयाचे स्वागतही केले. तर यातून महायुतीत खुशी आणि आघाडीत नाराजीचा सूरही दिसून आला.
सवा वर्षापूर्वी शिवसेनेत दोन गट पडले. एकनाथ शिंदे हे काही आमदारांना बरोबर घेऊन भाजपबरोबर जात मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले. याविरोधात शिवसेनेचा ठाकरे गट न्यायालयातही गेला होता. तर याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मागील काही महिन्यांपासून सुनावणी झाली. दोन्ही गटाच्यावतीने दावे-प्रतीदावेही करण्यात आले होते. याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला.
ठाकरे गटाने शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली होती. यावर अध्यक्षांनी शिंदे तसेच ठाकरे गटाचेही आमदार पात्र ठरविले. तसेच शिवेसना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचाही निर्णय दिला. अध्यक्षांच्या या निर्णयानंतर सातारा जिल्ह्यात शिंदे गटाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सातारा शहरातही जिल्हा कार्यालयासमोर शहरप्रमुख नीलेश मोरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो अशी घोषणाबाजीही करण्यात आली.
साताऱ्यातील या जल्लोषात उपशहरप्रमुख अमोल खुडे, विक्रम यादव, शहर संघटक शुभम भिसे, अमोल इंगोले, किरण कांबळे, ओंकार बर्गे, सयाजी शिंदे, सिध्देश जाधव, मनोज भोसले, यश खत्री, एझाज काझी, ह्षीकेश शिवडावकर, आदित्य यादव, प्रथमेश बाबर, मनिष मेथा, शुभम मेनकुदळे, ओंकार गायकवाड, अनिकेत भिसे, गणेश शिखरे, साईराज इथापे आदी सहभागी झाले होते.