Satara: दूध दरासाठी शिवसेना ठाकरे गटाने महामार्गावरच टॅंकर अडविले, डेअरीत घुसण्याचा दिला इशारा
By नितीन काळेल | Published: December 19, 2023 07:19 PM2023-12-19T19:19:09+5:302023-12-19T19:19:52+5:30
सातारा : प्रचंड दुष्काळ असताना शेतकऱ्यांना दुधाला लिटरला २७ ते २८ रुपये दर दिला जातोय. मात्र, पॅकिंगच्या दुधाला ६० ...
सातारा : प्रचंड दुष्काळ असताना शेतकऱ्यांना दुधाला लिटरला २७ ते २८ रुपये दर दिला जातोय. मात्र, पॅकिंगच्या दुधाला ६० रुपये द्यावे लागतात. भेसळयुक्त दुधालाही दुप्पट भाव आहे, असे आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने महामार्गावरच दुधाचे टॅंकर अडविले. तसेच आता दूध टॅंकर अडवले, नंतर डेअरीतही घूसू, असा इशाराही दिला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने दूध दरासाठी साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. खरीप हंगाम वाया गेला. तर रब्बीतील पिकेही पाण्याअभावी वाया जाण्याची भीती आहे. जनावरांना चाराच उपलब्ध होणार नाही. तरीही कसेबसे करुन शेतकरी पशुधन वाचवत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या दुधाला लिटरला अवघा २७ ते २८ रुपये दर शासन देत आहे. याचा जमा खर्च काढला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही.
मात्र, पॅकिंगच्या दुधाला ६० रुपये द्यावे लागतात. तसेच भेसळयुक्त दुधालाही दुप्पट भाव मिळतोय. असे असातना जिल्ह्याचा अन्न व आैषध प्रशासन विभाग झोपला आहे का ? अशी शंका येते. शेतकऱ्यांना दुधाला योग्य दर देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनीही अधिवेशनात दुधाबद्दल भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्या घेऊन शिवसैनिकांनी साताऱ्यात बाॅंबे रेस्टाॅरंट चाैकात महामार्गावर आंदोलन केले.
शिवसैनिकांनी महामार्गावर उभे राहून दुधाचे टॅंकर अडविले. तसेच दूध दरासाठी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. यावेळी सातारा शहर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवसैनिक घटनास्थळावरुन बाजुला झाले. त्यामुळे वाहतूूक सुरळीत झाली.
दरम्यान, या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, उपजिल्हाप्रमुख दत्ता नलवडे, तालुकाप्रमुख रमेश बोराटे, गणेश अहिवळे, कोरेगाव शहरप्रमुख अक्षय बर्गे, महिपती डगरे, मुगुटराव कदम आदी सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील दूध संस्थांत मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. त्यामुळे अन्न व आैषध प्रशासन विभाग झोपला आहे का ? याविषयी शंका येत आहे. यापुढे शासनानेही शेतकऱ्यांकडून योग्य दराने दूध खरेदी करावे. अन्यथा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल. तसेच आता टॅंकर अडविले असलेतरी नंतर दरासाठी डेअरीमध्येही घूसू हाच आमचा इशारा आहे.- प्रताप जाधव, जिल्हाप्रमुख शिवसेना (ठाकरे गट)