Satara: याला हटवा, त्याला काढा; 'उध्दव'सेनेच्या मेळाव्यात राडा!

By प्रमोद सुकरे | Published: July 16, 2024 03:12 PM2024-07-16T15:12:58+5:302024-07-16T15:13:21+5:30

'शिवसैनिक म्हणतात हे तर आमच्या जिवंतपणाचे लक्षण'

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party's office bearers verbally clashed at a meeting in Satara and Karad of Sangli district | Satara: याला हटवा, त्याला काढा; 'उध्दव'सेनेच्या मेळाव्यात राडा!

Satara: याला हटवा, त्याला काढा; 'उध्दव'सेनेच्या मेळाव्यात राडा!

प्रमोद सुकरे

कराड : राज्याच्या राजकारणात रगेल म्हणून ओळख असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा आणि सांगली जिल्ह्याचा पदाधिकारी मेळावा नुकताच कराडला झाला. पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्यासमोर पदाधिकारी आपल्या भावना व्यक्त करत असताना हा काम करत नाही त्याला हटवा, त्याला काढा अशा रोखठोक भावनाही काही पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. पण सुरुवातीला झालेली ही शाब्दिक चकमक शेवटी 'राड्या'पर्यंत पोहोचली.याबाबत उलट सुलट चर्चा असल्या तरी शिवसैनिक तर हे आमच्या जिवंतपणाचे लक्षण आहे असे सांगताना दिसत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी, तालुकाप्रमुख ,तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी यांचा संयुक्तिक मेळावा कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात पार पडला. यावेळी पक्षाचे नेते भास्करराव जाधव, नेत्या वैशाली शिंदे, उपनेते प्रा. नितीन बानुगडे- पाटील,संयोजक प्रमुख हर्षद कदम यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर होते.

यावेळी भास्कर जाधव यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घ्यायला सुरुवात केली. ज्यावेळी सांगली जिल्ह्याचा आढावा आला तेव्हा एका नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांने एका जुन्या पदाधिकाऱ्यावर काम व्यवस्थित होत नसल्याची टीका केली. त्यावेळी सभागृहात उपस्थित पदाधिकाऱ्यांच्यात तू तू मैं मैं झाले. पण समारोपाच्या वेळी हे वातावरण राड्यापर्यंत पोहोचले. शेवटी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यात मध्यस्थी करीत हा विषय तात्पुरता संपवला. पण याचे भविष्य काळात काय परिणाम होतील? ते पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.

सातारच्या पदाधिकाऱ्यावरही नाराजी!

सातारच्या एका पदाधिकाऱ्याबाबतही एका कार्यकर्त्यांने कामाबाबत असमाधानी असल्याचे सांगत त्यांना बदलण्याची भूमिका मांडली. त्यावेळी सभागृहात त्याचे पडसाद उमटले नाहीत.पण सांगलीचा प्रकार झाल्यानंतर  सभागृहातून बाहेर पडताना पुन्हा त्या दोन पदाधिकाऱ्यात जुंपल्याचे अनेकांनी पाहिल्याची चर्चा आहे.

कराडच्या पदाधिकाऱ्यालाही कार्यकर्त्यांनी सुनावले

कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू असताना कराडातील एका पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत नेत्यांना काही सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी तो सांगलीचा प्रश्न आहे. त्यांचे ते बघतील असे त्या नेत्याला सुनावले त्याचीही  शिवसैनिकांच्यात खुमासदार चर्चा सुरू आहे.

शिवसैनिकांच्या भावना,भूमिका समजून घेण्यासाठीच पक्षनेते आले होते. त्या भूमिका मांडत असताना शिवसैनिक आवेशाने बोलले .ती शिवसेनेची स्टाईलच आहे. त्यातून किरकोळ चिडाचिडीचे प्रकार झाले. फार मोठे काही घडलेले नाही.पक्षीय पातळीवर हे चालत राहते. - हर्षद कदम, जिल्हाप्रमुख, सातारा

Web Title: Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party's office bearers verbally clashed at a meeting in Satara and Karad of Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.