शिवसेनेत यापुढे फितुरी चालणार नाही

By Admin | Published: December 18, 2014 09:24 PM2014-12-18T21:24:09+5:302014-12-19T00:22:45+5:30

बानुगडे-पाटील यांचा इशारा : काम करेल त्यालाच पद

Shiv Sena will no longer be a threat | शिवसेनेत यापुढे फितुरी चालणार नाही

शिवसेनेत यापुढे फितुरी चालणार नाही

googlenewsNext

महाबळेश्वर : ‘पद शिवसेनेचे आणि काम इतर पक्षाचे हे आता चालणार नाही. जर पक्षाचे काम करायचे नसेल, तर पद सोडा आणि चालते व्हा. पक्षाचा आदेश हा पाळावाच लागेल. यापुढे पक्षात फितुरी चालणार नाही, अशा भ्रमात कोणी असेल तर भ्रम काढून टाका. काम करेल त्यालाच पद, जमत नसेल तर राहा, अन्यथा दरवाजा उघडा आहे,’ असा सज्जड इशारा शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.
सातारा व सांगली जिल्ह्यांच्या संपर्क नेते म्हणून शिवसेनेचे प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे काम सुरू केल्यानंतर त्यांचे दोन्ही जिल्ह्यांत संपर्क दौरे सुरू आहेत. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात महाबळेश्वर येथील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यात झाली. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जिल्हा प्रमुख नंदकुमार घाडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, गोपाळ वागदरे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाबळेश्वर वगळता वाई, खंडाळा तालुक्यांतील काही पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षाचे काम केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. अशा पदाधिकाऱ्यांचा प्रा. पाटील यांनी खरपूस समाचार घेतला व या पुढे अशा कार्यकर्त्यांना पक्षात पाठीशी घातले जाणार नाही, असे संकेत दिले.
ते म्हणाले, ‘आता यापुढे केवळ एक वर्षासाठी पक्षाचे पद दिले जाईल. काम करणाऱ्यालाच पुढे संधी दिली जाईल. नाहीतर त्या पदावर इतरांना संधी दिली जाईल, असे स्पष्ट करून त्यांनी वाई व खंडाळा तालुक्यांत पक्षांतर्गत मोठे फेरबदल करण्याचे सूतोवाच केले. पक्षाने आपणास काय दिले यापेक्षा आपण पक्षाला काय दिले याचे प्रथम आत्मपरीक्षण केले पाहिजे.असेही बानुगडे-पाटील म्हणाले.
यावेळी तालुका प्रमुख यशवंत घाडगे, शहरप्रमुख विजय नायडू, जिल्हा महिला संघटक शारदा जाधव अशोक शिंदे, लक्ष्मण कोंढाळकर, गणेश उतेकर, लीलाताई शिंदे, हरिभाऊ सपकाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena will no longer be a threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.