शिवसेनेचे पाय सत्तेच्या ‘फेव्हिकॉल’मध्ये अडकलेत - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 01:17 PM2017-11-25T13:17:06+5:302017-11-25T13:21:29+5:30
शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
क-हाड : 'मी पन्नास वर्षे सार्वजनिक व राजकीय जीवनात काम करतोय; पण सत्तेत राहायचं आणि मित्रपक्षाच्या विरोधातच आंदोलने करत बोलायचं, असं मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही. शिवसेनेला सत्तेचा मोह सोडवत नाही, असं मी यापूर्वीही बोललो होतो. त्यामुळे ‘ध’ चा ‘मा’ करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. क-हाड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, ‘शेतक-यांच्या कर्जमाफीवर सरकारने आडमुठी भूमिका घेतली तर आम्ही सत्तेवर लाथ मारू, असे विधान यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते; पण काय करणार ते आमच्या मित्राचे चिरंजीव आहेत. त्यामुळे जास्त काय बोलणार? शेतक-यांच्या कर्जमाफीला छत्रपती शिवरायांचे नाव देऊन शेतक-यांचाच नव्हे तर शिवरायांचाही यांनी अवमान केला आहे. सत्तेत येतानाही या मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव वापरले. मात्र, शिवरायांचे स्वराज्य कुठे आणि यांचे सरकार कुठे, हे जनतेला कळू लागले आहे.’
‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना पूर्ण करता आले नाही. ते स्वप्न आमचे सरकार पूर्ण करीत आहे,’ असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिवादनावेळी केल्याचे समजल्यानंतर पवार यांनी त्याचाही समाचार घेतला. पवार म्हणाले, ‘हा तर या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे. मुख्यमंत्री ज्या विचारधारेत वाढले आणि काम करीत आहेत, त्या विचारधारेचा यशवंतराव चव्हाणांना कधी स्पर्शही झाला नाही, ही त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे.’
‘१५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६ हजार १५ कोटी कर्जमाफीची रक्कम जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले आहे. त्याबद्दल विचारले असता, यापूर्वीही दोनदा मुख्यमंत्र्यांनी असेच विधान केले होते. मात्र, कर्जमाफीचा फायदा शेतक-यांना झालेला नाही. त्यांचे विधान म्हणजे ‘बोलाची कडी आणि बोलाचाच भात,’ असल्याची टीकाही पवार यांनी केली.
''ममता बॅनर्जींना लवकरच भेटणार''
ममता बॅनर्जी यांनी नुकतीच मुंबईत भेट घेतली. ती कशासाठी, असे विचारले असता, भेट त्या दोघांची झाली. त्यामुळे ती कशासाठी झाली आणि भेटीवेळी काय चर्चा झाली, हे मला माहीत नाही. मात्र येत्या आठवड्यात ममता बॅनर्जींना मी भेटणार असून, त्यावेळी याची माहिती घेईन, असे त्यांनी सांगितले.
''रस्त्यावर महिन्यात खड्डे पडतात!''
सुप्रिया सुळेंच्या ‘खड्डे वुईथ सेल्फी’वर सत्ताधा-यांकडून टीकेची झोड उठत आहे. या खड्ड्यांना राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचे ते सांगतात. याबाबत छेडले असता पवार म्हणाले, ‘रस्ते दुरुस्तीचे काम हे खरंतर अव्याहतपणे सुरू असतं. आम्ही सत्तेवर असतानाही ते सुरूच राहायचं. आत्ताही कदाचित ते सुरू असेल. मात्र, कामाला गुणवत्ता नसल्यामुळे महिन्यात रस्त्यावर खड्डे पडतात, ही बाब गंभीर आहे.’