शिवसेनेच्या दोन गटात जोरदार हाणामारी
By admin | Published: May 28, 2015 12:35 AM2015-05-28T00:35:49+5:302015-05-28T01:00:56+5:30
विठुरायाचीवाडी येथे तोडफोड : परस्परविरोधी फिर्यादी; घर, गाडीवर दगडफेक
कवठेमहांकाळ : शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख दिनकर पाटील आणि वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंत्रे समर्थकांत मंगळवारी जोरदार हाणामारी झाली. पाटील समर्थकांनी देशिंगच्या वैभव कुमार जाधव याला दमदाटी केली, तर शिंत्रे समर्थकांनी मंगळवारी मध्यरात्री विठुरायाचीवाडी येथे मल्हारी गेंड या पाटील समर्थकाची गाडी, बंगला आणि सामाजिक सभागृहावर दगडफेक केली. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.
मंगळवारी दुपारी देशिंगच्या वैभव जाधव याने तालुकाप्रमुख दिनकर पाटील, अर्जुन मल्हारी गेंड आणि अमोल जाधव यांच्यासह दहा ते बारा जणांविरोधात फिर्याद दिली आहे. संदीप शिंत्रे कुठे आहे? अशी विचारणा करीत शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, तर याचा राग मनात धरून शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंत्रे याचा चुलत भाऊ अमित शिंत्रे, सागर जाधव यांच्यासह तीस ते चाळीस समर्थकांनी मंगळवारी मध्यरात्री विठुरायाचीवाडी येथे धिंगाणा घातला.
चारचाकी वाहनांतून आणि पंधरा ते वीस दुचाकीवरून आलेल्या या जमावाने, तू दिनकर पाटील यांचे काम का करतोस, असा जाब विचारत शाखाप्रमुख मल्हारी गेंड यांच्या बंगल्यावर दगडफेक केली. चारचाकीवर दगडफेक करून सुमारे दोन लाखांचे नुकसान केले आहे. यावेळी शिंत्रे समर्थकांनी बांधलेल्या सामाजिक सभागृहावरही दगडफेक केली. सभागृहाच्या काचा फोडल्या. आसपासच्या घरावरही दगडफेक केली. हा धिंगाणा मध्यरात्री उशिरापर्यंत चालूच होता.
याबाबत मल्हारी विठ्ठल गेंड यांनी पोलीस ठाण्यात वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंत्रे याचा चुलत भाऊ अमित शिंत्रे, सागर जाधव यांच्यासह समर्थकांविरोधात फिर्याद दिली आहे. दरम्यान, तालुकाप्रमुख दिनकर पाटील व संदीप शिंत्रे समर्थकांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. (वार्ताहर)