दक्षिण आफ्रिकेत कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये ९ सातारकरांचा झेंडा, भारतातून ३३६ स्पर्धकांचा सहभाग 

By प्रगती पाटील | Published: June 11, 2024 07:11 PM2024-06-11T19:11:42+5:302024-06-11T19:12:07+5:30

पूर्णपणे डोगरदर्‍यातून होणारी ही मॅरेथाॅन अतिशय खडतर

Shiv Spirit team from Satara achieved success in Comrade Marathon held in South Africa | दक्षिण आफ्रिकेत कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये ९ सातारकरांचा झेंडा, भारतातून ३३६ स्पर्धकांचा सहभाग 

दक्षिण आफ्रिकेत कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये ९ सातारकरांचा झेंडा, भारतातून ३३६ स्पर्धकांचा सहभाग 

सातारा : दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये साताऱ्याच्या शिव स्पिरीट टीमने उत्तुंग यश मिळवले. ८७ किलोमीटरची ही मॅरेथॉन डर्बन या शहरात चालू होऊन पीटरमॅटीजबर्ग या शहरामध्ये संपते. जगभरातून २४ हजार स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. भारतभरातून ३३६ स्पर्धकांपैकी साताऱ्यातून शिव स्पिरिट टीमच्या ३६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. पूर्णपणे डोगरदर्‍यातून होणारी ही मॅरेथाॅन अतिशय खडतर मानली जाते.

सातारा मधून नऊ जणांनी शिव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. पहाटेच्या थंडीमध्ये ही मॅरेथॉन चालू होते आणि पाच मोठे डोंगर आणि २५ हून अधिक लहान डोंगर पार करत ही मॅरेथॉन ८७ किलोमीटर संपते. जगातील अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या मॅरेथॉनमध्ये ही मॅरेथॉन गणली जाते. यावर्षी कॉम्रेड मॅरेथॉनचे हे ९७ वर्षे होते. गेले सहा महिने अतिशय खडतर परिश्रम सातारा मधील शिवस्पिरिटच्या टीमने घेतले.

पहाटे एक वाजता कधी बारा वाजता हे ट्रेनिंग चालू व्हायचे झोपेची आणि जीवाची परवा न करता या सर्व शिवस्पिरिट टीमने अतिशय मेहनत केली. शिवस्पिरिट टीमचे सर्वेसर्वा शिव यादव यांनी नियोजनबद्ध मार्गदर्शन केले. तसेच दिव्यानी निकम यांनी अतिशय पद्धतशीरपणे आहाराचे मार्गदर्शन केले. सर्व धावपटूंचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून काैतुक होत आहे. 

हे आहेत रनर

साताऱ्यातून या स्पर्धेसाठी डॉ. सुधीर पवार, डॉ. मयूर फरांदे, यश मुचांडी, अजित निकम, विजय भिलारे, राजेंद्र रासकर, अनिरुद्ध पोतेकर, उदय घोरपडे, अल्मास मुलाणि यांनी ही खडतर स्पर्धा पूर्ण केली. डॉ. सुधीर पवार यांनी ही स्पर्धा दुसऱ्यांदा पूर्ण केली. सर्व शिव स्पिरीट टीम चे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. कास अल्ट्रा ही स्पर्धा या टीमने सातारा येथे खास कॉमरेडस मॅरेथॉनच्या सरावासाठी आयोजित केली होती. देशभरातून ५०० स्पर्धक साताऱ्यात येऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

धावपटूंसाठी सातारा हे सर्वोत्तम ठिकाण आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही साताऱ्यातून काॅम्रेड मॅरेथाॅनमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सहभाग वाढण्याबरोबरच ही स्पर्धा यशस्वी करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने रनर हब अशीही साताऱ्याला नवी ओळख मिळत आहे. - शिव यादव, फिटनेस ट्रेनर

Web Title: Shiv Spirit team from Satara achieved success in Comrade Marathon held in South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.