सातारा : साखळी येथील शिवपुतळा पुन्हा सन्मानाने बसवा : शिवेंद्रसिंहराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:26 PM2018-03-08T12:26:51+5:302018-03-08T12:26:51+5:30
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत देशाचे आराध्यदैवत. महाराष्ट्राची आणि प्रत्येक मराठी मनाची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा गोवा राज्यातील साखळी या नगरपालिकेकडून हटवण्यात आला. ही खेद आणि चिंतेची बाब आहे. गोवा सरकारने साखळी येथील शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी सन्मानाने स्थानापन्न करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

साखळी ता. सत्तारी, जि. उत्तर गोवा येथील भर चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा साखळी नगरपालिकेने बेकायदेशीर ठरवून हटवला. या कृत्याबद्दल निषेध करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे की, संपूर्ण देशभरात असंख्य पुतळे आहेत. मात्र, त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळेच कसे बेकायदेशीर वाटतात. शिवपुतळा हटवण्यामागे नेकमा काय हेतू आहे, हेच समजत नाही.
न भुतो, न भविष्यती असे आदर्शदायी व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्वांनाच प्रेरणादायी आहे. शिवछत्रपती म्हणजे तमाम मराठी जनांची अस्मिता आणि प्रतिष्ठा आहे. असे असताना भर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गोवा राज्यातील एका नगरपालिकेने हटवावा, ही अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी बाब आहे.
साखळी नगरपालिकेकडून अक्षम्य अशी चूक झाली आहे. यामुळे शिवछत्रपतींचा घोर अवमान झालेला आहे. गोवा सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने साखळी येथील चौकात पुतळा होता त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत बसवावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केली आहे.