शिवजयंती साजरी व्हावी, पण काळजी घे‌ऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:37+5:302021-02-15T04:34:37+5:30

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राची नव्हे, तर आपल्या देशाची अस्मिता आहेत. आज ते जर असते, तर ...

Shiva Jayanti should be celebrated, but with care! | शिवजयंती साजरी व्हावी, पण काळजी घे‌ऊन!

शिवजयंती साजरी व्हावी, पण काळजी घे‌ऊन!

Next

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राची नव्हे, तर आपल्या देशाची अस्मिता आहेत. आज ते जर असते, तर त्यांनी जनतेच्या सुरक्षेचाच विचार केला असता. सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता शिवजयंती साजरी करायला हवी; पण स्वत:ची काळजी घेऊन, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शिवजयंती साजरी करण्याबाबत निर्बंध आणले आहेत. याच मुद्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप आणि मनसेने सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयाबद्दल खा. उदयनराजे भोसले यांना रविवारी पत्रकारांनी छेडले असता त्यांनी, आपली स्पष्ट भूमिका स्पष्ट केली.

उदयनराजे म्हणाले, कोरोनाच्या महामारीत अनेकांनी जवळची लोकं गमावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहेत आणि त्यांची जयंती ही झालीच पाहिजे; परंतु त्याचबरोबर आपल्या लोकांची काळजी घेणे ही आपली आणि शासनाची अशी सर्वांचीच जवाबदारी आहे. शिवराय आज असते, तर त्यांनीसुद्धा असाच विचार केला असता. त्यांनी लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळे शिवजयंती साजरी जरूर करा, पण स्वत:चीसुद्धा काळजी घ्या.

दरम्यान, तब्बल ७६ कोटी खर्च करून सुरू झालेल्या ग्रेड सेपरेटरचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातारा पालिकेकडे करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांनी हस्तांतरणाची फाईल पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत दिली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अ‍ॅड. दत्ता बनकर, बांधकाम सभापती सिध्दी पवार, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नगरसेवक किशोर शिंदे आदी उपस्थित होते.

(चौकट)

विकासासाठी अडीच कोटींचा निधी

पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास आले. येथे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. याबरोबरच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा व त्याच्या सुशोभिकरणाचे कामही लवकरच मार्गी लावले जाईल. याच्या विकसनासाठी अडीच कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीकडून दिले जाणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

(चौकट)

आरक्षणप्रश्नी मार्ग निघेल

काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खा. उदयनराजे यांनी भेट घेतली होती. याबाबत विचारले असता ‘आरक्षणप्रश्नी चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल’ याची खात्री असल्याचे ते म्हणाले.

फोटो : १४ सातारा ग्रेड सेपरेटर

साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातारा पालिकेकडे करण्यात आले. यावेळी खा. उदयनराजे भोसले, अभियंता राहुल अहिरे, मुख्याधिकारी अभिजित बापट आदी उपस्थित होते.

Web Title: Shiva Jayanti should be celebrated, but with care!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.