शिवजयंती साधेपणाने सामाजिक उपक्रम राबवून करावी : बाई माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:46 AM2021-02-17T04:46:27+5:302021-02-17T04:46:27+5:30
दहिवडी : ‘कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने सामाजिक उपक्रम राबवून करावी,’ असे आवाहन तहसीलदार बाई माने यांनी केले. शिवजयंतीच्या आनुषंगाने ...
दहिवडी : ‘कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने सामाजिक उपक्रम राबवून करावी,’ असे आवाहन तहसीलदार बाई माने यांनी केले.
शिवजयंतीच्या आनुषंगाने दहिवडी पोलीस ठाणेअंतर्गत गावातील शिवजयंती मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, पोलीसपाटील यांची बैठक येथील नवीन प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पुरातत्त्व स्थापत्य विशारद हर्षवर्धन गोडसे, इतिहास तज्ज्ञ आप्पासाहेब देशमुख, सामाजिक कार्यकर्ते गणेश काटकर, पोलीसपाटील संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, ‘११ फेब्रुवारीच्या शासनाच्या परिपत्रकानुसार कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिवजयंती एकत्रित न येता साधेपणाने साजरी करावी. पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण व आयोजन करू नये. प्रभातफेरी, दुचाकीफेरी वा मिरवणुका काढू नयेत. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. शासनाने फक्त दहा लोकांना परवानगी दिली आहे. आरोग्यविषयक उपक्रम जसे की तपासणी व रक्तदान शिबिरे राबविण्यास प्राधान्य द्यावे. कोविडच्या सूचना व नियमांचे पालन करावे.’
हर्षवर्धन गोडसे यांनी पारंपरिक पद्धतीने सर्व काळजी घेऊन शिवजयंती साजरी करावी, तर आप्पासाहेब देशमुख यांनी शिवजयंती मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
........
चौकट..
सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार..!
शिवजयंती साजरी न करता दहिवडी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत बिदालच्या मंडळाच्या वतीने आप्पासाहेब देशमुख तसेच दहिवडीच्या मंडळाच्या वतीने किरण जाधव, अनिल जाधव यांनी तत्काळ मदत करण्याचे जाहीर केले.