अजिंक्यतारा किल्ल्यावर होणार ‘शिवसृष्टी’

By admin | Published: July 1, 2016 10:51 PM2016-07-01T22:51:30+5:302016-07-01T23:36:15+5:30

‘शिव‘घराण्याचा पुढाकार : अनोखी मेघडंबरी अन् शिवस्मृती उद्यानासाठी साताऱ्यातील मान्यवर मंडळी एकत्र

Shiva Shrishti will be held on the fort at Ajinkya Fort | अजिंक्यतारा किल्ल्यावर होणार ‘शिवसृष्टी’

अजिंक्यतारा किल्ल्यावर होणार ‘शिवसृष्टी’

Next

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पुनित झालेल्या ‘अजिंक्यतारा’ किल्ल्याची आजची दुरवस्था दूर करण्याची प्रतिज्ञा ‘शिव’घराण्याच्या वारसदारांनी केली आहे. किल्ल्यावर अनोखी मेघडंबरी अन् शिवस्मृती उभारण्यासाठी शिवाजीराजे व चंद्रलेखाराजे भोसले या दाम्पत्याने पुढाकार घेतला असून, लोकसहभाग अन् शासकीय पातळीवर सहकार्य यांच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.
सातारा शहराची ओळख अन् अस्मिता असणाऱ्या या अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचे अनेक वेळा वास्तव्य होते. ‘मराठ्यांची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या या किल्ल्यावर सात तळी होती. सात देवालये होते. शिवघराण्यातील अनेक पिढ्या याच ठिकाणी होत्या; मात्र सध्या पुस्तकातील इतिहास वगळता या किल्ल्यावर पाहण्यासारखे अथवा अनुभवण्यासारखे काहीच नाही. सध्या पडिक बुरुजांशिवाय या किल्ल्यावर काहीच नाही. ही खंत गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीराजे दाम्पत्याला होती. या किल्ल्यावर ‘शिव इतिहास’ पुन्हा जतन करण्यासाठी त्यांनी साताऱ्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींशी चर्चा केली आहे. गेल्या एक महिन्यापासून अदालत वाड्यावर रोज बैठका होत असून, सर्वांच्या कल्पनेतून नवा प्रकल्प उदयास येत आहे.
अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला असून, त्यासाठी लागणारा लोकसहभाग अन् सरकार निधी उपलब्ध करण्याबाबत ‘किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली आहे.
छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याची आठवण चिरंतन राहण्यासाठी या किल्ल्यावर ‘मेघडंबरी’ उभारण्याचा निर्णयही या प्रतिष्ठानने घेतला असून, त्यासाठी लोकसहभाग अत्यंत गरजेचा असल्याचे मतही शिवाजीराजे भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. (क्रमश:)


अजिंक्यतारा किल्ला ही तमाम सातारकरांची अस्मिता असून, याचा इतिहास चांगल्या पद्धतीने जगासमोर आणणे, हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. ‘शिवस्मृती प्रतिष्ठान’ ही सर्व सामान्य सातारकरांचीच कल्पना असून, लवकरच यातून किल्ल्यावर सुंदर अशी ‘शिवसृष्टी’ उभारलेली दिसेल.
-शिवाजीराजे भोसले, सातारा

Web Title: Shiva Shrishti will be held on the fort at Ajinkya Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.