धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे शिवार हिरवेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:02+5:302021-07-14T04:44:02+5:30
आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यापर्यंत वाहिल्याने सिमेंट बंधारे, पाझर तलावात पाणी टिकून ...
आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यापर्यंत वाहिल्याने सिमेंट बंधारे, पाझर तलावात पाणी टिकून शेती हिरवीगार झाली आहे. यंदा पाण्याची टंचाई कमी प्रमाणात जाणविल्याने शेतकरीही चिंतामुक्त दिसत आहेत.
फलटण तालुका म्हटला की, दुष्काळी भाग. या दुष्काळामुळे तरुणांची लग्न जमविण्यात अडचणी, अर्ध गाव माथाडी कामगार अन् रोजगार हमीवर असायचे, पाण्यासाठी माणसांबरोबरच जनावरांचे स्थलांतर ठरलेलं, नळपाणीपुरवठा योजनेवर प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करूनही पाणीटंचाई कायम यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून माजी आमदार दिवंगत शिवाजीराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दिवंगत डॉ.कृष्णचंद्र भोईटे यांनी जललक्ष्मी, पाणी अडवा पाणी जिरवा या योजनांतून तालुक्यात पाणी अडविण्याचा प्रयत्न केला.
धोम धरणाच्या कालव्यातून शिवथर खिंडीतून कालव्याद्वारे कोरेगाव, फलटण तालुक्याला पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण झाले. माजी खासदार दिवगंत हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाणीप्रश्नावर सातत्याने आवाज उठविला होता.
त्यानंतर, भाजप-शिवसेना युतीचे शासन आले. त्यांना अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामध्ये फलटणचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर होते. त्यांनी धोम-बलकवडी धरणासाठी प्रयत्न करून युती शासनाच्या माध्यमातून धोम-बलकवडी धरणाचे काम सुरू केले, पण कालव्याची कामे संथ गतीने झाली. अखेर दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धोम बलकवडी उजव्या कालव्याची कामे मार्गी लागली व आदर्की ते आंदरूडपर्यंत धोक-बलकवडीचे पाणी पोहोचले. गत सहा वर्षांपासून पाणी टप्प्याटप्प्याने फलटण तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले. यंदा मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धोक-बलकवडी कालव्यात पाणीसाठी टिकून असल्याने याचा शेतीला मोठा फायदा झाला. पिके चांगली आल्याने बळीराजाही सुखावला आहे.