पुस्तकातून मनामनात रूजणार शिवरायांचे विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:19+5:302021-02-23T04:59:19+5:30
सातारा : डिस्कळ (ता. खटाव) येथील तरुणांनी यावर्षी शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली. शिवरायांचे विचार घराघरातच नव्हे तर मनामनात ...
सातारा : डिस्कळ (ता. खटाव) येथील तरुणांनी यावर्षी शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली. शिवरायांचे विचार घराघरातच नव्हे तर मनामनात रुजविण्यासाठी या तरुणांनी गावातील तीस मुलांना ‘एकच पर्याय फक्त शिवराय’आणि ‘प्रभाव व्यक्तिमत्वाचा’ ही दोन पुस्तके भेट देऊन एका नव्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यात दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी कोरोनामुळे जयंती उत्साहात साजरी झाली नसली, तरी शिवभक्तांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
डिस्कळ येथील क्रांतिवीर नवरात्रोत्सव मंडळाने (ईगल ग्रुप) यावर्षीची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली. यानिमित्त होणाऱ्या अवाढव्य खर्चाला बगल देत यावर्षी एखाद्या विधायक कामासाठी हा खर्च करावा, असा विचार तरुणांमधून पुढे आला. अखेर विचारविनिमय केल्यानंतर छत्रपती शिवरायांचे विचार मनामनात रुजविण्यासाठी व ते आचरणात आणण्यासाठी गावातील मुलांना शिवरायांची पुस्तके भेट देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मंडळाच्या सदस्यांनी ‘एकच पर्याय फक्त शिवराय’ आणि ‘प्रभाव व्यक्तिमत्वाचा’ ही पुस्तके खरेदी केली. गावातील तीस मुलांना या पुस्तकांचे वाटप करून क्रांतिवीर ग्रुपने नव्या ‘क्रांती’ची मुहूर्तमेढ रोवली. दरम्यान, जयंतीदिनी गावातील प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकविण्यात आला.
या उपक्रमात विक्रम विटकर, पवन दळवी, साकीब मुलानी, शुभम जाधव, यश पवार, राहुल विटकर, गणेश पवार, रोहित पवार, यश ठोंबरे, अक्षय चव्हाण, स्वराज पवार, प्रणव पवार आदींनी सहभाग घेतला.
फोटो : २२ डिस्कळ फोटो
डिस्कळ (ता. खटाव) येथील क्रांतिवीर नवरात्रोत्सव मंडळाने शिवजयंतीनिमित्त गावातील मुलांना पुस्तकांचे वाटप केले.