संततधार पावसामुळे शिवारे जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:23+5:302021-06-18T04:27:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंगापूर : सातारा तालुक्यातील अंगापूर परिसरात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शिवारे जलमय झाली आहेत. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंगापूर : सातारा तालुक्यातील अंगापूर परिसरात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शिवारे जलमय झाली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पेरणी झालेल्या पिकांच्या उगवणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे; तर पेरणी न झालेल्या शेतातील खरिपाच्या पेरण्या रखडणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
अंगापूर परिसरात रविवारपर्यंत ऊन-पाऊस असेच वातावरण होते. यामुळे परिसरातील शेतकरी खरिपाच्या पेरणीत व्यस्त होते. दरम्यानच्या काळात काही प्रमाणात भात, कडधान्य, सोयाबीन, भुईमूग यांसारख्या पिकांची पेरणी होऊन सध्या उगवण होत आहे. अशातच दोन दिवसांपासून सर्वत्र सरींवर सरी कोसळत आहेत. या पावसामुळे शिवारात पाणीच पाणी दिसून येत आहे. तसेच शिवारे जलमय झाली आहेत. अनेक ठिकाणांच्या शेतातून पाणी वाहत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणांच्या शेतातून पाणी बाहेर पडून नुकसान झाले; तर सखल भागांत पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रातील अंकुरणारी कडधान्ये, सोयाबीन यांसारखी कोवळी पिके नासून तर जाणार नाहीत ना? अशी भीती शेतकऱ्यांना पडली आहे.
पाऊस होत असल्याने शेतातील कामे ठप्प झाली आहेत. काही क्षेत्रांतील पेरणी शिल्लक असल्याने त्या रखडणार आहेत. संततधार कोसळणाऱ्या या पावसामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रातील कोवळ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे; तर काही ठिकाणची पेरणी रखडणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
फोटो दि. १७ अंगापूर पाऊस फोटो...
फोटो ओळ : सातारा तालुक्यातील अंगापूर परिसरात पावसामुळे पाणी साचून शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. (छाया : संदीप कणसे)