'शिवशंकर' पतसंस्थेचे व्यवहार ठप्प; ठेवीदार अस्वस्थ!

By प्रमोद सरवळे | Published: October 20, 2022 09:44 PM2022-10-20T21:44:41+5:302022-10-20T21:47:04+5:30

याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड येथील लिंगायत समाजातील लोकांच्या पुढाकारातून सुमारे २५ वर्षांपूर्वी शिवशंकर नागरी पतसंस्थेची स्थापना झाली. व्यापारी लोकांनी सुरू केलेली ही पतसंस्था अल्पावधीतच नावारूपाला आली. त्यामुळे संस्थेच्या ठेवीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

Shivashankar credit institution business stopped Depositors upset | 'शिवशंकर' पतसंस्थेचे व्यवहार ठप्प; ठेवीदार अस्वस्थ!

कराड येथील मुख्य बाजारपेठ असणारी शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था गेल्या १० दिवसापासून बंद आहे. ( फोटो- प्रमोद सुकरे)

googlenewsNext

प्रमोद सुकरे, कराड- सध्या दिवाळीची धामधूम जोरात सुरू आहे. बाजारपेठेत सर्वत्र गर्दी आहे. पण या सगळ्या गर्दीत आणि धावपळीत कराडच्या बाजारपेठेतील शिवशंकर नागरी पतसंस्था गेल्या १० दिवसापासून बंदच आहे. तेथील सगळेच व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्यात मोठी अस्वस्थता पसरली आहे.अनेकांनी उपनिबंधकांकडे लेखी अर्ज करून ठेवी परत करण्याची मागणी केली आहे. दिवाळीच्या तोंडावरच पतसंस्थेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने मिळत नसल्याने सभासद, ठेवीदार आक्रमक होताना दिसत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड येथील लिंगायत समाजातील लोकांच्या पुढाकारातून सुमारे २५ वर्षांपूर्वी शिवशंकर नागरी पतसंस्थेची स्थापना झाली. व्यापारी लोकांनी सुरू केलेली ही पतसंस्था अल्पावधीतच नावारूपाला आली. त्यामुळे संस्थेच्या ठेवीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुख्य बाजारपेठेतच संस्था असल्याने लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

  सध्या या पतसंस्थेत सुमारे २५ कोटींवर ठेवी आहेत. मात्र गत १० आक्टोंबर पासून पतसंस्थेचे दारच उघडलेले नाही. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. परिणामी ठेवीदार, खातेदार अस्वस्थ झाले आहेत. संस्थाच बंद असल्याने दत्तात्रय तारळेकर, रवींद्र मुंढेकर, अशोक संसुद्दी, उदय  हिंगमिरे यांच्यासह १०० वर ठेवीदारांनी ठेवी परत मिळत नाहीत त्या परत मिळाव्यात म्हणून उपनिबंधक कराड यांच्याकडे लेखी अर्ज दाखल केले आहेत. मात्र अद्याप तरी कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही.

 संस्थेत गेले तर संस्था बंद अवस्थेत आहे. आणि संचालक मंडळाला भेटायला गेले तर संचालकही घरात भेटत नाहीत,त्यांचे फोन लागत नाहीत असे अनेक जण सांगतात. त्यामुळे ठेवीदारांच्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या लोकांच्या ठेवी, पैसे, दागिने केव्हा परत मिळणार? हा खरा प्रश्न आहे.

 अध्यक्षच म्हणतात कर्मचाऱ्यांनी अपहार केलाय ... -
पतसंस्थेचे अध्यक्ष शरद मुंढेकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी उपनिबंधक कराड यांना एक पत्रव्यवहार केला आहे. त्यात पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर कर्ज प्रकरण करून अपरातफर केली असल्याचे म्हटले आहे. सेवक वर्गाने संस्थेचे कर्ज प्रकरणाचे रेकॉर्ड मध्ये चुकीच्या नोंदी करून मंजूर कर्ज रकमेमध्ये फेरबदल करून स्वअक्षरांमध्ये जादाची रक्कम परस्पर लावून नोंद केली आहे. तरी दोषींवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे.

 ठेवीदारांच्या बैठकीत सगळेच आक्रमक -
संस्थेच्या ठेवीदारांची दोन दिवसांपूर्वी येथील लिंगायत मठ संस्थेत बैठक झाली. या बैठकीला   ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी त्रासलेल्या ठेवीदारांनी संस्थेच्या संचालक मंडळासह कर्मचाऱ्या विरोधात आक्रमक मते मांडली. पैसे परत मिळाले नाहीत तर लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.

शिवशंकर पतसंस्थेच्या संदर्भात ठेवी परत मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी आमच्या कार्यालयात केल्या आहेत. आम्ही संस्थेच्या संचालक मंडळाला त्यांचे अपूर्ण असणारे ऑडिट त्वरित सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. ते आँडिट आमच्याकडे आल्यानंतर पुढील निर्णय आम्ही घेणार आहोत.
- संदीप जाधव, उपनिबंधक, सहकारी संस्था, कराड

Web Title: Shivashankar credit institution business stopped Depositors upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.