शिवभोजनचा आता साडेतीन हजार लोकांना प्रतिदिन होणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:20+5:302021-04-21T04:39:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील गोरगरीब जनतेला मोफत शिवभोजन थाळी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यातील गोरगरीब जनतेला मोफत शिवभोजन थाळी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये अडीच हजार लोकांना प्रतिदिन या जेवणाचा आस्वाद घेता येत होता. आता शासनाने इष्टांक वाढून दिल्याने जिल्ह्यातील साडेतीन हजार लोक प्रतिदिन या भोजनाचा लाभ घेऊ शकणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आदींच्या जेवणाअभावी हाल-अपेष्टा होत असल्याने २९ मार्चच्या परिपत्रकानुसार शिवभोजन थाळीची किंमत तीस मार्चपासून प्रथम तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पाच रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने याला वेळोवेळी मदतवाढ देता देण्यात आली. ‘ब्रेक द चेन’ची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली आहे, या कालावधीत गरीब व गरजू लोकांना जेवणा अभावी हाल-अपेष्टा सहन कराव्या लागू नयेत यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता, याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे
जिल्ह्यात १५ एप्रिलपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कालावधीत संपूर्ण राज्याचा शिवभोजन थाळीचा इष्टांक दोन लक्ष प्रतिदिन एवढा राहणार आहे. त्या अनुषंगाने शिवभोजन थाळीचा राज्याच्या इष्टांक वाढविला आहे.
सद्य:स्थितीतील सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या प्रतिदिनी इष्टांकामध्ये दीडपट वाढ करण्यात येत आहे. त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील लोकांना मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. यापूर्वी अडीच हजार थाळ्या प्रतिदिन जिल्ह्यामध्ये ‘शिवभोजन’च्या माध्यमातून वितरित होत होत्या, आता त्यामध्ये तब्बल एक हजारांनी वाढ झालेली आहे. आता तब्बल साडेतीन हजार शिवभोजन थाळी जिल्ह्यातील ३० केंद्रांच्या माध्यमातून मोफत वाटल्या जाणार आहेत.
शिवभोजन केंद्रांवर हे नियम सक्तीचे
१ शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे पालन करावे
२ शिवभोजन केंद्रातून दुपारी अकरा ते चार या कालावधीत पार्सल सुविधेद्वारे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
३ कोणताही लाभार्थी लाभाविना परत जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आले आहेत.
४ कोणत्याही सबळ कारणांशिवाय शिवभोजन केंद्र बंद राहणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे
५ संपूर्ण शिवभोजन केंद्राचे दररोज निर्जंतुकीकरण करावे शिवभोजन केंद्रातील कर्मचारी तसेच पार्सल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे
६ केंद्रावर सामाजिक अंतराच्या नियमांचे कसोशीने पालन करावे
७ भोजन तयार करणाऱ्या प्रत्येक तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत
८ खोट्या नावाने तसेच लाभार्थ्यांची छायाचित्रे शिवभोजन टाकली जाणार नाहीत याची खबरदारी शिवभोजन केंद्रचालकाने घ्यावी
९ सर्व शिवभोजन केंद्राची पुरवठा यंत्रणेद्वारे या महिन्यात किमान एकवेळा काटेकोर तपासणी करण्यात यावी.
फोटो ओळ
सातारा येथील शिवभोजन केंद्रांवर मंगळवारी जेवण घेण्यासाठी अशी रांग लागली होती. (छाया : जावेद खान)