शिवेंद्रराजे पालिकेत.. नगरसेवक बैठकीबाहेर !
By admin | Published: November 3, 2014 10:19 PM2014-11-03T22:19:36+5:302014-11-03T23:28:09+5:30
कामाचा आढावा : पाणी गळतीबाबत पालिका प्रशासनाला सूचना
सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगरसेवकांना टाळून पालिकेत पाणी गळती व इतर विषयांच्या अनुषंगाने सोमवारी दुपारी बैठक घेतली. या बैठकीबाबत कुठल्याही नगसेवकाला बोलवायचे नाही, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या बैठकीत त्यांनी कर्मचाऱ्यांना कुठल्याही दबावाला बळी न पडता कामे करावीत, अशा सूचनाही केल्या.
शिवेंद्रसिंहराजेंनी सोमवारी दुपारी अचानकपणे पालिकेला भेट दिली. मुख्याधिकारी अभिजित बापट यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. शहरातील जलवाहिन्यांच्या गळत्या व आरोग्याच्या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतला. रस्त्यांमध्ये जलवाहिन्यांना असणाऱ्या गळत्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गळत्या काढण्याची कामेही सुसूत्रतेने सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांवर डांबरीकरण करायचे असल्याने या गळत्या प्रथम काढून घ्याव्यात. यासाठी शहरात सर्व्हे करावा. लिकेज काढणाऱ्या कंत्राटदारांनी आपल्याकडील टीम वाढवावी. ‘कुणी सांगितले तर कामे अर्धवट टाकून ती करायला जाऊ नका, मुख्य रस्त्यांवरील गळत्या प्राधान्याने काढून घ्या,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी सूचना केल्या. प्रशासनाने ठरवून दिल्यानुसार घंटेवारी करा. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. काय असेल ते थेट माझ्याशी बोला, जबाबदारीने कामे करा. या कामात तुमच्या पाठीशी मी आहे. मात्र हलगर्जीपणा कराल तर होणाऱ्या कारवाईला तुम्हीच जबाबदार राहाल.’
आरोग्य कर्मचाऱ्यांनी शहरात जागोजागी फॉगिंग करावे, साथीच्या आजारांचा अटकाव करा. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पालिकेत आल्याची माहिती मिळाल्यानंतर नगराध्यक्ष सचिन सारस व आरोग्य सभापती रवींद्र झुटिंगही मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये दाखल झाले. मात्र, इतर नगरसेवक या बैठकीला उपस्थित नव्हते. याचीच चर्चा दिवसभर सुरू होती. (प्रतिनिधी)
दबावाचे राजकारण बंद
पाणीपुरवठा व आरोग्य विभागांच्या कामांमध्ये नगरसेवक दबावाचे राजकारण करतात. याची काणकुण आमदारांना लागल्याचे बैठकीतून समोर आले. त्यामुळे त्यांनी नगरसेवकांना दूर ठेवून थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.