सातारासाठी शिवेंद्रराजे यांचा शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 08:49 PM2024-10-28T20:49:19+5:302024-10-28T20:49:28+5:30
साताऱ्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गांधी मैदानापासून पोवई नाकामार्गे तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातून दुचाकी रॅलीही काढली.
सातारा : सातारा विधानसभेसाठी सोमवारी आमदार महायुतीतून शिवेंद्रसिंहराजे भोसले, रिपाइंमधून (आठवले गट) हणमंत तुपे तसेच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. साताऱ्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गांधी मैदानापासून पोवई नाकामार्गे तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातून दुचाकी रॅलीही काढली.
सातारा येथे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या यादीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली. तथापि, महाविकास आघाडीतून उमेदवार निश्चित होत नव्हता. अखेर राष्ट्रवादीतून इच्छुक असणाऱ्या अमित कदम यांनी हाती शिवबंधन बांधल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित झाली. या दोन्ही उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज भरले.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शेंद्रे (ता. सातारा) येथे साखर कारखान्यावर अभयसिंहराजे भोसले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. नंतर राजवाडा गांधी मैदानावर आले. याठिकाणी फुलांनी सजविलेल्या वाहन रथातून त्यांच्या रॅलीस सुरुवात झाली. यावेळी त्यांच्या सोबत चुलतबंधू खासदार उदयनराजे भोसलेदेखील उपस्थित होते. ही रॅली मोती चौकातून खालचा रस्तामार्गे पोवई नाक्याकडे मार्गस्थ झाली. पाचशे एक पाटी, शेटे चौक, पोलिस मुख्यालय पोवई नाक्यावर आली. शेटे चाैकात, गुरुवार परज आणि मल्हार पेठेत कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. राजवाडा आणि मल्हार पेठ येथे जेसीबीतून फुलांचा हार घालण्यात आला.
रॅली पोवई नाक्यावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर आ. शिवेंद्रराजे भोसले अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी विक्रमसिंहराजे भोसले, वृषालीराजे भोसले, सुनील काटकर, राजू भोसले, ॲड. दत्ता बनकर, वसंत मानकुमरे, नीलेश मोरे व महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय वेदांतिकाराजे भोसले अपक्ष, रिपाइंचे हणमंत देवीदास तुपे, अभिजित आवाडे-बिचकुले यांनीही उमेदवारी अर्ज भरले.
अमित कदम आज अर्ज दाखल करणार
राष्ट्रवादीने ही जागा उद्धव सेनेला सोडल्यानंतर सचिन मोहिते आणि अमित कदम यांच्यापैकी कोण याचा फैसला अखेर झाला आहे. राष्ट्रवादीच्या अमित कदम यांनी शिवबंधन बांधले असून उद्धव सेनेतून मंगळवारी ते अर्ज दाखल करणार आहेत.