बोंडारवाडीसाठी शिवेंद्रराजे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:28 PM2018-11-27T23:28:43+5:302018-11-27T23:28:48+5:30
सातारा : ‘जावळी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित बोंडारवाडी धरण प्रकल्पाला तत्काळ मंजुरी देऊन धरणाच्या कामासाठी निधी मंजूर करावा, या ...
सातारा : ‘जावळी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित बोंडारवाडी धरण प्रकल्पाला तत्काळ मंजुरी देऊन धरणाच्या कामासाठी निधी मंजूर करावा, या प्रमुख मागणीसह सातारा तालुक्यातील लावंघर उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लावा आणि उरमोडी धरण प्रकल्पाच्या सातारा तालुक्यातील कालव्यांची कामे तातडीने पूर्ण करा, या मागण्यांसाठी सातारा-जावळी मतदारसंघाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकला.
या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लक्षवेधी वेशभूषा करून विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर अनोखे आंदोलन केले. दरम्यान, सरकारने मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणातील पाणी खाली जाऊ देणार नाही, असा गंभीर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
डोंगराळ आणि टंचाईग्रस्त जावळी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. तसेच लावंघर व परळी भागातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी उरमोडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत लावंघर उपसा सिंचन योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेचे काम सुरू करण्यासाठी आणि उरमोडी धरणातून सातारा तालुक्यात सिंचनासाठी सुरू असलेली कालव्यांची कामे पूर्ण व्हावीत, यासाठीही आ. शिवेंद्रसिंहराजे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र राज्य सरकार आणि शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनोखे आंदोलन केले.
अनोखा पोषाख अन् डोक्यावर गांधी टोपी
मुंबईत अधिवेशन सुरू असून, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसºया दिवशी (मंगळवारी) आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मागण्यांचा उल्लेख असलेला पोषाख परिधान करून आणि गांधी टोपी डोक्यावर घालून केलेल्या आंदोलनामुळे दिवसभर या आंदोलनाचीच चर्चा रंगली.