राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचा गेम झाला: शिवेंद्रसिंहराजे भोसले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 09:25 PM2022-05-27T21:25:39+5:302022-05-27T21:26:12+5:30
मराठा आरक्षणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांच्यामागे मोठा जनसमुदाय आहे. संपूर्ण राज्यातील युवक आणि मराठा समाज त्यांच्या मागे आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी देताना त्यांचा गेम झाला आहे.
सातारा :
मराठा आरक्षणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांच्यामागे मोठा जनसमुदाय आहे. संपूर्ण राज्यातील युवक आणि मराठा समाज त्यांच्या मागे आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी देताना त्यांचा गेम झाला आहे. आता तो कोणी केला, हे संभाजीराजेंना माहीत आहे. त्यामुळे त्यावर फारसे बोलणार नाही, असे मत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बोंडारवाडी धरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, संभाजीराजे हे छत्रपती घराण्याचे वारसदार आहेत. मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मोठा समाज त्यांच्यासोबत आहे. त्यांची राज्यसभेची खासदारकी गेली असली. तरीही घरातील माणूस म्हणून त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी या मराठा समाजाला एकत्र ठेवण्याचे काम यापुढेही करावे. योग्य वेळ येईल त्यावेळी त्यांनी योग्य घ्यावेत.
ते पुढे म्हणाले, संभाजीराजे यांचे काम खूप मोठे आहे. त्यांनी मराठा आरक्षणावर राज्यात वातावरणनिर्मिती केली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही त्यांनी मराठा समाजाचे संघटन केले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांनीही त्यांच्यासोबत राहिले पाहिजे. मराठा समाजातील कोणी माणूस पुढे जात असेल, तर आपण त्यांचे पाय ओढत असतो. त्यामुळे अशी भूमिका न घेता संभाजीराजेंना भविष्यात कशी मदत होईल, अशी भूमिका राहिली पाहिजे.