शिवेंद्रसिंहराजेंचीे उच्च न्यायालयात धाव-- सुरुचि हल्ला प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:29 PM2017-10-13T23:29:12+5:302017-10-13T23:31:50+5:30
सातारा : सुरुचिवरील धुमश्चक्री प्रकरणी पोलिसांनी आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्याने दाखल केलेले दोन्ही गुन्हे खोटे असून, ते रद्द करण्यात यावेत,
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सुरुचिवरील धुमश्चक्री प्रकरणी पोलिसांनी आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्याने दाखल केलेले दोन्ही गुन्हे खोटे असून, ते रद्द करण्यात यावेत, अशी याचिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या सुमारे दोनशे कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते अजिंक्य मोहिते यानेही शिवेंद्रसिंहराजेंवर गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांच्या विरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अॅड. धीरज घाडगे यांच्या वतीने शिवेंद्रसिंहराजेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यामध्ये पोलिस अधिकाºयांनी अपूर्ण माहितीच्या आधारे फिर्याद नोंद केली आहे. ती खोटी असून रद्द करण्यात यावी, असे अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने शाहूपुरी पोलिसांना यावर आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पोलिसांनी अद्यापही यावर म्हणणे सादर केले नसल्याचे अॅड. धीरज घाडगे यांनी सांगितले.
सध्या न्यायालयाला दिवाळीची सुटी लागणार असल्यामुळे आता यावर सुनावणी दिवाळीनंतर होणार आहे.
दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरुचिवर झालेल्या धुमश्चक्रीनंतर पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पोलिसांवर हक्कभंग आणि न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सुतोवाच केले होते. आमच्याच घरावर हल्ला झाला असताना पोलिसांनी आमच्यावरच गुन्हा कसा दाखल केला? असाही प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी त्यावेळी उपस्थित केला होता.
आमदारांच्या चार कार्यकर्त्यांना कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सुरुचिवरील धुमश्चक्री प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अटक केलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी दुसºया गुन्ह्यात अटक केली. यामध्ये चारीही कार्यकर्त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्या अटकेत असलेल्या सात कार्यकर्त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सुरुचिवर दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्यानंतर पोलिसांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यामध्ये हर्षल चिकणे, नितीन सोडमिसे, चेतन सोळंखी, प्रतीक शिंदे यांचा समावेश होता. या चौघांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी दुसºया गुन्ह्यात त्यांना शुक्रवारी अटक केली.