शिवेंद्रसिंहराजे रिक्षातून ‘आरटीओ’त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:08 AM2017-09-14T00:08:42+5:302017-09-14T00:08:46+5:30

Shivendra Singh Rao 'RTI' from rickshaw | शिवेंद्रसिंहराजे रिक्षातून ‘आरटीओ’त...

शिवेंद्रसिंहराजे रिक्षातून ‘आरटीओ’त...

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : रिक्षा पासिंगसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या जाचक अटी त्वरित शिथिल करण्याची मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी तातडीने जाचक अटी शिथिल केल्याचे स्पष्ट केले. हौस म्हणून कोणीही रिक्षा चालवत नाही. रिक्षावाल्यांनी चोºया-माºया करायच्या का? आत्महत्या करायची?, असा जळजळीत सवाल उपस्थित करीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना खडे बोल सुनावले.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तीन चाकी, चार चाकींसह सर्वप्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाºया वाहनांना ४२ प्रकारच्या विविध अटी व नियम घालण्यात आले आहेत. रिक्षाचे पासिंग करताना रिक्षामध्ये फायर एक्स्टिंग्यूशर असला पाहिजे. रिक्षात हँडब्रेक असला पाहिजे. स्पीडॅमीटर पाहिजे. रिफ्लेक्टर पाहिजेत, यांसह अन्य काही जाचक अटी घालण्यात आल्या होत्या. यामुळे सातारा शहरातील सुमारे ४ हजार रिक्षाचालकांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. तसेच सदर अटींमुळे पासिंगची तारिख आलेल्या रिक्षांचे पासिंगही झाले नाही आणि त्यामुळे संबंधित रिक्षाचालकांना आरटीओकडून दंड ठोठाविण्यात येत होता. या सर्व प्रकारामुळे हैराण झालेल्या रिक्षाचालकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी रिक्षावाल्यांना दिले होते.
हजारो रिक्षाचालक रिक्षा घेऊन बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरुची बंगल्यावर दाखल झाले. यामुळे सुरुचीसमोर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात झाला. आरटीओसोबत बैठक असल्याने एवढी गर्दी होणार नाही, असे पोलिसांना वाटले. मात्र, सकाळी अकरा वाजता रिक्षांची संख्या वाढली. सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरुची येथे रिक्षावाल्यांच्या समस्या ऐकून घेऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धायगुडे यांच्या कार्यालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे, माजी नगराध्यक्ष नासीर शेख, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, बाळासाहेब खंदारे, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण यांच्यासह विजय काळोखे, हर्षल चिकणे, नाना इंदलकर आदींसह शेकडो रिक्षाचालक दाखल झाले. आत जागा नसल्याने बाकीच्यांनी बाहेर थांबावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. त्यामुळे हजारो रिक्षाचालक व्हरांड्यात, पायºयांवर आणि संपूर्ण कार्यालयात थांबले. धायगुडे यांनी लागू केलेले नियम व अटी वाचून दाखविल्या. यावेळी उपस्थित रिक्षाचालकांनी त्याला जोरदार विरोध दर्शविला. यावेळी धायगुडे यांच्या कार्यालयात जोरदार गोंधळ झाला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांना शांत केले आणि धायगुडे यांना रिक्षाचालकांची परिस्थिती आणि बाजू पटवून दिली. हजार-बाराशे रुपयांचा फायर एक्स्टिंग्यूशर बसविणे, रिक्षाचालकांना परवडणारे आहे का? ज्या कंपन्यांत रिक्षा तयार होतात, त्यांनीच रिक्षात पासिंगसाठी जे आवश्यक आहे, ते बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे फायर एक्स्टिंग्यूशर, स्पीडॅमीटर आदी जाचक आणि न परवडणाºया अटी लादू नका, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सुनावले. रिक्षावाल्यांना पुढेही त्रास देऊ नये, अशी विनंतीवजा सूचनाही त्यांनी अधिकाºयांना केली.
शेकडो रिक्षांची
रांग लागली...
शिवेंद्रसिंहराजे सुरुची बाहेर उभ्या असलेल्या एका रिक्षात बसले आणि आरटीओ कार्यालयाकडे निघाले. त्यांच्या रिक्षाच्या मागे रिक्षांची रांग लागली आणि हजारो रिक्षा आरटीओ कार्यालय परिसरात दाखल झाल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या समवेत हजारो रिक्षा चालक आणि मालक आरटीओ कार्यालयात आले होते. चर्चा सफल झाल्यानंतर पासिंगच्या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी धायगुडे यांना बोलावून एका पेट्रोल रिक्षात बसविलेला फायर एक्स्टिंग्यूशर काढायला लावला.

Web Title: Shivendra Singh Rao 'RTI' from rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.