शिवेंद्रसिंहराजेंनी केली ‘पालिकेची फिट्टमफाट’
By admin | Published: February 23, 2017 11:18 PM2017-02-23T23:18:22+5:302017-02-23T23:18:22+5:30
सातारा पंचायत समितीत ११ जागा : उदयनराजेंच्या गटाला ६ तर भाजपला ३ जागांवर रोखले
सागर गुजर --सातारा पालिकेत झालेल्या पराभवाचे उट्टे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने पंचायत समिती निवडणुकीत काढले. २० पैकी ११ जागा जिंकत आमदार गटाने सातारा पंचायत समितीवर एकहाती सत्ता मिळविली. मात्र, जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाने भाजपच्या मदतीने विजय मिळवित आमदार गटाशी बरोबरी साधली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा तालुक्यात राजकारणाचे अजब रसायन तयार केले होते. काँगे्रसशी जाहीर युती करत सर्वच ठिकाणी आपल्याला मानणारे उमेदवार उभे केले. त्यांनी भाजपशी केलेली युतीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी समोर आली. काँगे्रस व भाजप या दोन टोकांच्या पक्षांना सोबत घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी तयार केलेले ‘राजकीय रसायन’ अनेकांना विस्मित करणारे ठरले होते. मात्र, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने जोरदार फिल्डिंग लावून पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता आणली.
जिल्हा परिषदेच्या २० गणांपैकी पाटखळ, लिंब, गोडोली, शेंद्रे, कारी या पाच गटांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणले. तर शाहूपुरी, कोडोली, नागठाणे या गटांत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. वर्णे, वनवासवाडी या दोन गटांत भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.
पंचायत समितीचे शिवथर, पाटखळ, लिंब, किडगाव, खेड, गोडोली, शेंद्रे, अंबवडे बुद्रुक, कारी, अतीत, वर्णे या गटांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणले आहेत. तर कोंडवे, शाहूपुरी, तासगाव, कोडोली, संभाजीनगर, दरे खुर्द या सहा गणांत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने वनवासवाडी, नागठाणे व अपशिंगे गणांत यश मिळविले आहे.
पंचायत समितीच्या सत्तेत राष्ट्रवादी ११, सातारा विकास आघाडी ६ तर भाजप ३ असे बलाबल असणार आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला पूर्ण बहुमत मिळाले असल्याने सातारा पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता असणार आहे.
शेंद्रे गटात साविआचे बंडखोर माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ यांना डावलून शेंद्रे गटात ‘साविआ’ने जकातवाडीतील अपक्ष उमेदवार विठ्ठल ऊर्फ योगेश शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादीचे प्रा. शिवाजीराव चव्हाण यांच्याशी त्यांची लढत झाली. यात चव्हाण यांनी विजय मिळविला.
पाटखळ गटात वनिता गोरे (राष्ट्रवादी) यांनी हेमलता चवरे (साविआ), सीमा सोनटक्के (भाजप) यांचा पराभव केला. लिंब गटात प्रतीक कदम (राष्ट्रवादी) यांनी बाळासाहेब गोसावी (साविआ) यांचा पराभव केला. शाहूपुरी गटात अनिता चोरगे (साविआ) यांनी ज्योती गाडे (राष्ट्रवादी) यांना पराभूत केले.
गोडोली गटात लक्ष्मी ओव्हाळ (साविआ) यांचा मधू कांबळे (राष्ट्रवादी) यांनी पराभव केला. वनवासवाडी गटात रेश्मा शिंदे (भाजप) यांनी विजया कांबळे (राष्ट्रवादी) यांचा पराभव केला.
कोडोली गटात अर्चना देशमुख (साविआ) यांनी संगीता कणसे (राष्ट्रवादी) यांना पराभूत केले. कारी गटात कमल जाधव (राष्ट्रवादी) यांनी श्वेता पवार (भाजप), राजश्री शिंदे (साविआ) यांचा तर नागठाणे गटात भाग्यश्री मोहिते (साविआ) यांनी विमल मोहिते (राष्ट्रवादी) यांचा पराभव केला. वर्णे गटात भाजपचे मनोज घोरपडे यांनी विजय मिळविला. धनंजय कदम (राष्ट्रवादी), प्रताप गायकवाड (बंडखोर सेना), दिनेश घाडगे (शिवसेना), मनोज घोरपडे (भाजप), गणेश देशमुख (साविआ), राजेंद्र शेळके (स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांना पराभव पचवावा लागला.
शिवथर गणात दयानंद उघडे (राष्ट्रवादी) यांनी ४ हजार ५९९ मते मिळवून विजय मिळविला. पाटखळ गणात राहुल शिंदे (राष्ट्रवादी) यांनी ४ हजार ५३ मते मिळवून विजय मिळविला.
लिंब गणात जितेंद्र सावंत (राष्ट्रवादी) यांनी ५ हजार ३७ मते मिळवून विजय मिळविला. किडगाव गणात सरिता इंदलकर (राष्ट्रवादी) यांनी ५ हजार ५३६ मते मिळवून विजय मिळविला.
शाहूपुरी गणात संजय पाटील (साविआ) यांनी २ हजार ४६१ मते मिळवून राष्ट्रवादीच्या भारत भोसले यांचा पराभव केला. गोडोली गणात आशुतोष चव्हाण (राष्ट्रवादी) यांनी २ हजार ३१३ मते मिळवून विजय मिळविला. वनवासवाडी गणात रंजना जाधव (भाजप) यांनी ४ हजार २३८ मते मिळवून विजय मिळविला. कोडोली गणात ‘साविआ’च्या रामदास साळुंखे यांनी बाजी मारली.
संभाजीनगर गणात ‘साविआ’च्या रेखा शिंदे यांनी बाजी मारली. शेंद्रे गणात छाया कुंभार (राष्ट्रवादी) यांनी विजय मिळविला. अंबवडे गणात विद्या देवरे (राष्ट्रवादी) यांनी बाजी मारली. कारी गणात अरविंद जाधव (राष्ट्रवादी) यांनी विजय मिळविला. नागठाणे गणात भाजपच्या विजया गुरव यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारली. वर्णे गणात कांचन काळंगे (राष्ट्रवादी) यांनी विजय मिळविला. अपशिंगे गणात भाजपच्या संजय घोरपडे यांनी विरोधकांना धूळ चारली.
कांचन साळुंखे यांची उमेदवारी महागात
कोडोली गटात राष्ट्रवादीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक कांचन साळुंखे यांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता कणसे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सातारा विकास आघाडीच्या उमेदवार अर्चना देशमुख यांनी ५ हजार ३५३ मते मिळवून विजय मिळविला. संगीता कणसे यांना ४ हजार ६८७ मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या बंडखोर कांचन साळुंखे यांना १ हजार १४१ मते मिळाली. आमदार गटातच बंडखोरी झाल्याने त्याचा फायदा खासदार गटाला झाला.
मतमोजणी सुरू असताना एकाची घोषणाबाजी
सातारा तालुक्यातील गट व गणाची मतमोजणी सुरू होती. अंबवडे गणाची मतमोजणी सुरू असताना राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर असल्याचे समजताच एका उत्साही कार्यकर्त्याने मतमोजणीच्या ठिकाणीच घोषणाबाजीला सुरुवात केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचा भंग करत संबंधित व्यक्ती आरडाओरड करत असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांनी त्याला हटकले. त्याला पकडण्यासाठी पोलिस धावले असतानाच त्याने मतमोजणीच्या ठिकाणापासून पळ काढला. पोलिसांनी त्याला शोधले पण तो निघून गेला होता.
जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत भाजपचा प्रवेश
सातारा तालुक्यातून जिल्हा परिषदेमध्ये वर्णे गटातून मनोज घोरपडे व वनवासवाडी गटातून रेश्मा शिंदे या भाजपच्या दोन उमेदवारांनी शिरकाव केला. पंचायत समितीमध्येही तीन जागा मिळवत भाजपने मुसंडी मारली आहे. मात्र, त्यांना विरोधकांची भूमिका बजवावी लागणार आहे.