शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांना मुख्यमंत्र्यांचा सांगावा; जिल्ह्याला मिळणार दोन लाल दिवे
By दीपक शिंदे | Updated: December 15, 2024 11:46 IST2024-12-15T11:46:04+5:302024-12-15T11:46:23+5:30
भाजप कार्यकर्त्यांनी अगदी होमववनपासून शिर्डीच्या साईबाबांपर्यंत साकडेही घातले होते. तसेच वरिष्ठ नेतृत्वासही आपल्या भावना कळवल्या होत्या.

शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांना मुख्यमंत्र्यांचा सांगावा; जिल्ह्याला मिळणार दोन लाल दिवे
दीपक देशमुख
सातारा : जिल्ह्यात आठ आमदार देणाऱ्या महायुतीतून कोणाची मंत्री पदासाठी वर्णी लागणार याची उत्सुकता अखेरपर्यंत ताणल्यानंतर अखेर शिवेंद्रराजे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगावा आला आहे. तसेच जयकुमार गोरे यांचेही नाव निश्चित झाले आहे. अजून कोणाकोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.
जिल्ह्यातून शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे हे भाजपातून तर शिंदेसेनेतून शंभुराजे देसाई आणि मकरंद पाटील हे राष्ट्रवादीतून मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. यामध्ये शंभूराजे देसाई यांची शिंदेसेनेतून मंत्रीपदी वर्णी निश्चित मानली जात होती. शिवेंद्रराजे यांच्या निवडीबाबतही कार्यकर्त्यांना ठाम विश्वास असला तरी अखेरपर्यंत उत्सुकता वाढली होती. भाजप कार्यकर्त्यांनी अगदी होमववनपासून शिर्डीच्या साईबाबांपर्यंत साकडेही घातले होते. तसेच वरिष्ठ नेतृत्वासही आपल्या भावना कळवल्या होत्या.
खासदार उदयनराजे भोसले आणि भाजपचे आमदार यांचीही त्यांच्या मंत्रीपदासाठी अनुकूलता होती. त्यामुळे लाल दिवा तर येणार पण अधिकृत सांगावा कधी येणार याची उत्सुकता होती. अखेर नागपूर अधिवेशनाच्या आदल्या दिवशी त्यांना सांगावा आला आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे यांचीही मंत्री पदासाठी वर्णी निश्चित झाली आहे. जिल्ह्यात आता दोन लाल दिवे येणार हे निश्चित आहे. त्यानंतर आता शिंदेसेनेतून शंभूराजे देसाई यांच्याबाबतही उत्सुकता वाढली आहे.