राजधानीत शिवरायांचे वस्तुसंग्रहालय रखडल
By Admin | Published: February 27, 2015 09:16 PM2015-02-27T21:16:03+5:302015-02-27T23:25:38+5:30
दुर्लक्षाचे दुखणे : बांधकाम-पुरातत्व विभाग दाखवतायेत एकमेकांकडे बोटे
सातारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वस्तूंना सातारा या त्यांच्या अखेरच्या राजधानीत जागा मिळेना झालीय! या ऐतिहासिक वस्तूंसाठी हजेरी माळावर गेल्या सहा वर्षांपासून वस्तुसंग्रहालयाचे काम रखडत-रखडत सुरू आहे. शासनाचे पुरातत्व व बांधकाम या दोन खात्यांमधील समन्वयाचा अभाव असल्यानेच हे काम रखडले आहे, असा आरोप शिवप्रेमींकडून केला जात आहे.सातारा शहर हे हिंदवी स्वराज्याची अखेरची राजधानी आहे. या शहरात शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तूंसाठी सुसज्ज असे संग्रहालय नव्हते. मार्केटयार्डमध्ये असणाऱ्या एका इमारतीमध्ये हे संग्रहालय सुरू आहे. शहरात सुसज्ज वस्तुसंग्रहालय व्हावे, या हेतूने तब्बल सहा वर्षांपूर्वी हजेरी माळावर वस्तुसंग्रहालय तयार करण्याचे काम सुरू झाले. यासाठी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून आठ कोटी रुपये मंजूर झाले.सुरुवातीच्या काळात निधी मिळाला. त्यानुसार हे काम वेगाने झाले; परंतु काही दिवसांतच हे काम रखडले. पुरातत्व-बांधकाम या दोन विभागांच्या समन्वयाअभावी हे काम अनेक दिवस रखडले होते. पुरातत्व विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणामुळे कामात अडथळे येत असल्याचा आरोप शिवप्रेमींनी सुरू केला होता. साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनीही उपोषण केले होते. त्यानंतर निधी मिळाला, काही प्रमाणात काम झाले. आता पुन्हा काम रखडले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे व खासदार उदयनराजे भोसले यांनी या कामाची प्रजासत्ताकदिनी पाहणी केली तेव्हा संग्रहालयाचे काम करताना ऐतिहासिक बाज कायम राहणे आवश्यक असल्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानंतरही कामाला गती आलेली नाही. पुरातत्व विभाग बांधकाम विभागाकडे आणि बांधकाम विभाग पुरातत्व विभागाकडे बोटे दाखविण्याव्यतिरिक्त कुठली हालचाल होताना दिसत नसल्याचे दुर्भाग्य आहे. (प्रतिनिधी)
बांधकाम विभागाकडे जे काम होते ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. आता उर्वरित काम पुरातत्व विभागाच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहे. काँक्रिट, प्लास्टर, फरशा बसविण्याचे काम आम्ही पूर्ण केले. आता संग्रहालयाला ऐतिहासिक बाज आणण्यासाठी पुरातत्व खात्यामार्फत काम होणे आवश्यक आहे; पुरातत्वच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटूनही लवकर निर्णय देत नाहीत.
- मनोज ढोगचौळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम
बांधकाम विभागाने काम पूर्ण करून वस्तुसंग्रहालय पुरातत्व खात्याकडे वर्ग करणे आवश्यक होते; परंतु अद्यापही त्यांनी कामे अर्धवट ठेवली आहे. संग्रहालयात पाण्याची टाकी आवश्यक आहे. पण, तीही अद्याप बसविण्यात आलेली नाही. जून महिन्यापासून ही किरकोळ कामेही झालेली नाहीत. अंतर्गत कामे पुरातत्वमार्फत करता येतील. वेळ लागला तरी काम चांगले होण्याकडे आमचे लक्ष आहे.
- एस. डी. मुळे, सहायक अभिरक्षक, पुरातत्व विभाग
..ती सहा वर्षे
तब्बल सहा वर्षांपूर्वी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या कामासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले होते. सुरुवातीच्या काळात हे काम वेगाने झाले. पण, पुरातत्व विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कामात पाचर ठोकल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून झाला. प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी आवाज उठविला होता. यानंतर रखडलेला निधी मिळाला होता.