शिवसेनेची हवा भारी... पण कुठाय कारभारी?

By admin | Published: May 22, 2014 12:11 AM2014-05-22T00:11:23+5:302014-05-22T00:21:39+5:30

कार्यकारिणी निवड थांबली : विधानसभा निवडणुकीआधी तरी जिल्हाध्यक्ष निवडणार का, हा प्रश्नच

Shivsena's air is heavy ... but the ugly steward? | शिवसेनेची हवा भारी... पण कुठाय कारभारी?

शिवसेनेची हवा भारी... पण कुठाय कारभारी?

Next

 सागर गुजर, सातारा : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजताच शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सातारा जिल्ह्याची शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त केली होती. विधानसभेच्या तोंडावरही ती निवडण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला गेलेला नसल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक नेतृत्वाविना पोरके असल्याचे चित्र असून, संघटनेच्या पातळीवरही या पक्षात शिथिलता आल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. ही शिथिलता दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. मूळच्या काँगे्रसच्या बालेकिल्ल्यात अण्णा देशपांडे व त्यांच्या मोजक्या शिलेदारांनी शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले आणि ते टिकवूनही ठेवले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीआधी पक्षाने आमदार दगडू सकपाळ यांच्याकडे जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद दिले. या निर्णयामुळे शिवसेनेचे संघटन वाढायला मदत झाली. मूळचे जावळी तालुक्यातील असणार्‍या दगडू सकपाळ यांनी जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण केला. शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली मरगळ झटकली गेली होती. याचा फायदा पुढे लोकसभा निवडणुकीत दिसून आला. सेनेने पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व सोपवले. जाधवांनीही संघटनाच्या पातळीवर पक्षात चांगले काम केले. पुढे पक्षाने त्यांना लोकसभेचे तिकीट देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविली. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवून तब्बल २ लाख ३५ हजार ६८ मते मिळविली. राष्ट्रवादीच्या उदयनराजेंविरोधात त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले असले, तरी युतीची ताकद यानिमित्ताने राष्ट्रवादीला समजून आली. शिवसेनेचे संघटन वाढावे व स्थानिक नेतृत्वाला संधी मिळावी, या उद्देशाने शिवसेनेने पुढे जिल्हाध्यक्षपदाची तिघांत विभागणी केली. सातारा व वाई मतदारसंघाचे नेतृत्व पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे देण्यात आले होते. माढा मतदारसंघाची जबाबदारी हणमंत चवरे यांच्याकडे देण्यात आली तर कºहाड उत्तर व दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व संजय मोहिते यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, या तिघांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुरघोड्या वाढल्या. राष्ट्रवादीच्या ताब्यातील सभापती निवासात आराम करत असणार्‍या हणमंत चवरे यांना तर पक्षातीलच एका गटाने डोळ्यांत मिरच्यांची पूड टाकून मारहाण केली होती. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधील वाढत्या बेबनावामुळे नाराज झालेल्या उध्दव ठाकरेंनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली होती. लोकसभेला सातारची जागा शिवसेनेच्या वाट्याला येत असतानाही ती महायुतीचा घटकपक्ष असणार्‍या रिपाइंला सोडली. या निवडणुकीत सेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली तर महायुतीचे उमेदवार अशोक गायकवाड यांना अवघी ७१ हजार मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत संघटन उरले नव्हते. शिवसेनेची विभागलेली मते शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष या नात्याने पुरुषोत्तम जाधव यांच्या पारड्यात गेली. विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाही शिवसेनेत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, असे चित्र आहे. योग्य नेतृत्व न मिळाल्यास कार्यकर्ते काँगे्रस किंवा राष्ट्रवादीच्या गळाला लागू शकतील अथवा मोदी लाटेचा परिणाम म्हणून भाजपच्या वळचणीला जातील. कार्यकर्ते भाजपकडे गेले तरी शिवसेनेच्या राजकारणाला त्याचा तोटा होणार नाही; तथापि पक्षसंघटनेच्या बाबतीत शिवसेना अधिक कमकुवत होण्याचीच शक्यता आहे.

Web Title: Shivsena's air is heavy ... but the ugly steward?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.