शिवसेनेच्या उप जिल्हाप्रमुखावर खासगी सावकारकीचा गुन्हा ; संजय भोसलेंसह दोघांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:01 PM2018-08-23T22:01:40+5:302018-08-23T22:02:03+5:30
दहिवडी : शिवसेनेचे सातारा जिल्हा उपप्रमुख संजय भोसलेसह विशाल विजय जगदाळे व हिंदुराव शंकर जगदाळे यांच्या विरोधात खासगी सावकारीचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. भोसले माणमधील बिजवडी तर इतर दोघे हे तालुक्यातीलच पाचवडचे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जोतिराम तुकाराम पवार (रा. पाचवड) यांनी २०१६ मध्ये एका पतसंस्थेचे कर्ज फेडण्यासाठी हिंदुराव जगदाळेकडून महिना दहा टक्के व्याजाने पैसे घेतले होते. मुद्दल व व्याज मिळून पवार यांनी जगदाळेला २ लाख ६० हजार परत केले. परंतु अजून एक लाख दे म्हणून जगदाळेकडून पवार यांना दमदाटी होत होती. तसेच पवार यांनी दिलेला कोरा धनादेश परत केला जात नव्हता.
जोतिराम पवार यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये हिंदुराव जगदाळेचे व्याजाने घेतलेले पैसे देणे व शेतीकामासाठी विशाल जगदाळेकडून ६ लाख ५० हजार रुपये महिना पाच टक्के व्याजदराने घेतले. प्रत्येक महिन्याला ३२,५०० रुपये असे एकूण पाच महिने पवार यांनी विशाल जगदाळेस व्याज दिले. दरम्यानच्या, कालावधीत विशाल जगदाळे पैशासाठी खूपच त्रास देत असल्याने पवार यांनी मार्च महिन्यात दोन लाख परत दिले. तर १ लाख ८० हजार विशाल जगदाळेच्या सांगण्यावरून शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजय भोसलेला देण्यात आले. त्यानंतरही विशाल जगदाळेने वारंवार पैशाचा तगादा लावला. तर संजय भोसलेने ‘तू विशालचे पैसे का देत नाहीस,’ म्हणून पवार यांना स्वत:च्या घरी डांबून ठेवले. रात्री दोन वाजता बिजवडी स्टँडवर नेऊन तिथे मारहाण केली. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर भोसलेने व्याजाने घेतलेले पैसे दे नाहीतर तुझी जमीन लिहून दे, अशी दमदाटी पवार यांना केली. तर फोनवरून वारंवार शिवीगाळही केली.
व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून जोतिराम पवार यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात अखेर तक्रार दिली. पवार यांच्या तक्रारीवरून संजय भोसले, विशाल जगदाळे व हिंदुराव जगदाळेच्या विरोधात खासगी सावकारी, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.