जिल्हा बँकेसाठी शिवसेनेचे पॅनेल
By admin | Published: January 29, 2015 10:58 PM2015-01-29T22:58:34+5:302015-01-29T23:34:26+5:30
पालकमंत्री : जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी आणणार
सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पॅनेल असेल, असे सूतोवाच पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज केले. नेहमी एकतर्फी होणाऱ्या या निवडणुकीत यावर्षी चुरस निर्माण होईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीबाबत शिवसेनेचे धोरण काय असणार, या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, ‘जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक आम्ही लढविणार आहोत. सहकारामध्ये पक्षाचा विचारच येत नाही. समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार आहोत. यातून कितपत यश मिळेल, हे मला माहीत नसले तरी सत्तेला ‘चेक’ बसविण्याचे काम आम्ही करू.’दरम्यान, जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा निधी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून आणणार असल्याचे सांगून पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या पहिल्याच ‘डीपीसी’ बैठकीत खुट्टा बळकट करण्यास सुरुवात केली. ‘गेल्या वर्षी २२८ कोटींचा जिल्हा विकास आराखडा मंजूर झाला होता. आताही २५० कोटींच्या वर जिल्'ासाठी निधी मिळावा, अशी मागणी नियोजन समितीच्या सर्वच सदस्यांनी केली असून, जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असे सांगून शिवतारे यांनी पालकमंत्री या नात्याने आपण कंबर कसून कामाला लागल्याचे सांगून टाकले. बहुतांश आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे असताना शिवसेनेच्या शिवतारेंना जिल्ह्यात जम बसवायचा असल्याने राजकीय आणि विकासात्मकदृष्ट्याही त्यांच्या वाटचालीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)
उदयनराजेंचा राजकीय
‘वाय-फाय झोन’
सत्ता असो वा नसो, आपलाच आवाज खणखणीत असणार, याची चुणूक खासदार उदयनराजे यांनी नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा दाखविली.
वर्चस्व अबाधित ठेवण्याचा फंडा दाखवून देताना त्यांनी ‘वाय-फाय झोन’च्या मागणीचा वापर केला आणि आपण ‘राजकीय वाय-फाय झोन’मध्ये असल्याचे दाखवून दिले.
स्वपक्षीयांवर शरसंधान सांधताना त्यांनी ‘वाय-फाय झोन रामराजेंच्या फलटणमध्ये केला असता; पण ते जिल्ह्याचे ठिकाण नाही,’ अशी कोटी केली. कऱ्हाडमध्ये ‘वाय-फाय’ची मागणी होताच उदयनराजे उसळले.
‘सर्वकाही कऱ्हाडमध्येच होणार असेल, तर जिल्ह्याचे नाव साताऱ्याऐवजी कऱ्हाडच करा,’ अशा शब्दांत त्यांनी संबंधिताला सुनावले. ‘आरटीओ, भूकंपमापन केंद्र, प्रशासकीय इमारत सगळंच कऱ्हाडला तर सातारला काय,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.