पेरू आणायला गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू
By admin | Published: July 4, 2016 12:11 AM2016-07-04T00:11:04+5:302016-07-04T00:11:04+5:30
वडगाव हवेलीतील घटना : उसात पडलेल्या तारेत अडकला पाय
वडगाव हवेली : पेरू आणण्यासाठी मित्रासोबत शिवारामध्ये गेलेल्या मुलाचा शेतात पडलेल्या वीज तारेत अडकून शॉक लागल्याने मृत्यू झाला. वडगाव हवेली येथील चव्हाण मळा रस्त्यावर ‘देशपांडके’ नावाच्या शिवारात रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अक्षय सुरेश मुळीक (वय १५, कार्वे-मुळीकमळा, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव हवेली येथे चव्हाण मळा रस्त्यावर देशपांडके नावाचे शिवार आहे. या शिवारातून वीजवाहक तारा गेल्या आहेत. संबंधित तारेमधील वीजपुरवठा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे हे खांब हटवून तारा काढाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी वीजवितरण कंपनीकडे केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वीज प्रवास सुरू नसल्याने त्या तारांकडे कोणीही लक्ष देत नव्हते. अशातच गत काही महिन्यांपासून या तारा लोंबकळत होत्या. काही ठिकाणी तारांचा पिकालाही स्पर्श होत होता. मात्र, प्रवाह नसल्याने शेतकरीही निर्धास्त होते.
रविवारी कार्वे-मुळीकमळा येथील अक्षय मुळीक हा मुलगा त्याच्या एका मित्रासमवेत देशपांडके शिवारात पेरू आणण्यासाठी गेला होता. पेरूचे झाड उसाच्या बांधावर असल्याने दोघे मित्र उसातून वाट काढीत बांधाकडे निघाले होते. त्याचवेळी उसात तुटून पडलेली वीज तार अक्षयच्या पायाखाली आली. त्यामुळे त्याला जोराचा धक्का बसून तो तेथेच कोसळला. या घटनेमुळे घाबरलेला मित्र तेथून पळाला. त्याने आपल्या घरी जाऊन या घटनेची माहिती दिली. गावातून ग्रामस्थ त्याठिकाणी येईपर्यंत शेतात काम करणाऱ्या काही ग्रामस्थांनी अक्षयला उसात निपचित पडल्याचे पाहिले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता अक्षयचा जागीच मृत्यू झाला होता.
संबंधित तारेतून वीजप्रवाह सुरू नसला तरी पावसामुळे प्रवाह उलटा वाहत असावा व त्यामुळेच अक्षयचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वीजकंपनीच्या कारभारामुळे मुलाचा नाहक बळी गेल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)
दूरक्षेत्र असूनही
पोलिस गायब...
वडगाव हवेली येथे पोलिस दूरक्षेत्र आहे. मात्र, तेथे अपवाद वगळता कधीही अधिकारी किंवा कर्मचारी फिरकत नाहीत. रविवारी घटनेनंतर काही ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मात्र, उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी आले नव्हते. वाटेत आहे, पावसात अडकलोय, अशी उत्तरे त्यांच्याकडून दिली जात होती. त्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.