धक्कादायक! शिरवळ येथे मंगल कार्यालयाची भिंत कोसळली, वधू-वरासह तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 09:44 PM2024-05-13T21:44:31+5:302024-05-13T21:44:50+5:30
सोमवारी सायंकाळी 6.45 च्या दरम्यान घडली घटना
मुराद पटेल, शिरवळ: खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एका मंगल कार्यालयात वादळी वाऱ्याने स्टेजच्या पाठीमागील भिंत व संरक्षक भिंत कोसळून झालेल्या घटनेमध्ये वधू-वर व वधूचे वडील असे तिघे जण जखमी झाले आहे. ही घटना सोमवार, 13 मे रोजी सायंकाळी 6.45 च्या दरम्यान घडली आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,शिरवळ ता.खंडाळा येथील एका मंगल कार्यालयात राजापूर ता.भोर जि.पुणे येथील खुटवड व कामथडी ता.भोर जि.पुणे येथील वाल्हेकर कुटुंबातील लग्न समारंभ आयोजित करण्यात आले होते.दरम्यान,सायंकाळी 6.45 वाजण्याच्या दरम्यान लग्नविधी उरकल्यानंतर मोठ्या प्रमाणात विजेसह वादळी वारे वाहू लागले होते.यावेळी कार्यालयाशेजारी असणाऱ्या गार्डनमधील स्टेजच्या पाठीमागील बाजूस असणारी संरक्षक भिंत तसेच स्टेजच्या पाठीमागील भिंत व त्यावर लावण्यात आलेले स्टेजच्या भिंतीवरील कृत्रिम सजावट लग्न कार्याकरीता करण्यात आली होती.
यावेळी लग्न समारंभ पार पडल्यानंतर छायाचित्र काढण्याकरिता व वधू-वरांना शुभेच्छा देण्याकरिता त्याठिकाणी नातेवाईकांनी गर्दी केली होती.दरम्यान,जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे अचानकपणे स्टेजच्या पाठीमागील भिंत तसेच संरक्षक भिंत अचानकपणे कोसळत कृत्रिम सजावट वधू पायल रामदास खुटवड(वय 24,रा.राजापूर ता.भोर जि.पुणे),वर प्रणव साहेबराव वाल्हेकर(वय 26,रा.कामथडी ता.भोर जि.पुणे) व वधूचे वडील रामदास हरिभाऊ खुटवड(वय 50,रा.राजापूर ता.भोर जि.पुणे)यांच्या अंगावर कोसळली.यावेळी अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे लग्न समारंभामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.यावेळी जखमी झालेल्या पायल खुटवड,प्रणव वाल्हेकर,रामदास खुटवड यांना नातेवाईकांनी वाहनातून तत्काळ शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.यावेळी संबंधितांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.यावेळी या घटनेची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय संकपाळ,शिरवळ रेस्क्यू टिम हे घटनास्थळी दाखल झाले.यावेळी रात्री उशीरापर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.