धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 07:53 PM2024-05-30T19:53:11+5:302024-05-30T20:01:07+5:30
अमानवी कृत्यामुळे उंब्रजमध्ये संतापाची लाट पसरली.
उंब्रज : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गटारात स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत सापडले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या अमानवी कृत्यामुळे उंब्रजमध्ये संतापाची लाट पसरली. दरम्यान, घटनेची तीव्रता पाहून काही ग्रामस्थांनी उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र उंब्रज पोलीस ठाण्यात असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी याची दखल एक तासाने घेऊन घटनास्थळी जाण्यात धन्यता मांडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,गुरुवारी दिनांक ३० रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास येथील रस्त्यावर मुले क्रिकेट खेळत होती. खेळताना मुलांचा बाॅल गटारात गेला. तेव्हा त्या मुलांना हे स्त्री जातीचे अभ्रक मृत अवस्थेत दिसून आले. यानंतर परिसरात मुलांनी ही घटना सांगितली. लगेचच सर्वत्र ही खळबळजनक माहिती पसरली.
यानंतर काही ग्रामस्थांनी उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तेथील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर व कर्मचारी यांनी एक तासाने या घटनेची दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन अर्भक ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. अहवालानंतर सदर अर्भकाविषयी अधिकची माहिती स्पष्ट होणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.
गटारात मिळालेले अर्भक स्त्री जातीचे असून पूर्ण वाढ झालेले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून ते गटारात असल्याचा कयास असून त्याची दुर्गंधी ही परिसरात पसरली होती.
उंब्रजमध्ये संतापाची लाट
स्त्री जातीचे नवजात अर्भक गटारात सापडल्याने एकच खळबळ उंब्रजमध्ये माजली. या अमानवी कृत्याबाबत व उंब्रज पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या असून घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.