पेन्शन एकटेच खाता म्हणत निवृत्त डीवायएसपीला मुलाने बेल्टने बदडले, साताऱ्यातील धक्कादायक घटना
By दत्ता यादव | Published: April 20, 2023 04:44 PM2023-04-20T16:44:00+5:302023-04-20T16:45:12+5:30
आशिष दादासाहेब गोडसे (वय ३९), रेखा दादासाहेब गोडसे (वय ५८) अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकाची नावे आहेत.
सातारा : ‘आलेली पेन्शन तुम्ही एकटेच खाता मला का देत नाही,’ असे म्हणत निवृत्त डीवायएसपीला त्यांच्या मुलाने बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना शाहूपुरी परिसरातील गुलमोहर काॅलनीत दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी मुलासह त्याच्या आईवरही शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष दादासाहेब गोडसे (वय ३९), रेखा दादासाहेब गोडसे (वय ५८) अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकाची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दादासाहेब वामन गोडसे (वय ६७, रा. अनुसया गुलमोहर काॅलनी, शाहूपुरी सातारा) हे पोलिस दलातून डीवायएसपी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. अद्यापही ते पोलिस प्रशासनाला गुन्हेगारांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासंदर्भात मार्गदर्शन करतात. त्यामुळे ते पुणे, मुंबईला सतत फिरतीवर असतात.
दोन दिवसांपूर्वी ते साताऱ्यातील आपल्या घरी आले. दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरात ते पेपर वाचत बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा आशिष गोडसे याने पेन्शन तुम्ही एकटेच खाता. मला का देत नाही, असे म्हणत बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने काठीने त्यांच्या पायावर, हातावर, पाठीवर बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर मुलगा त्यांना मारहाण करत असताना गोडसे यांची पत्नी रेखा हिने त्यांचे हात धरून मुलाला मारहाण करण्यास मदत केली. यामध्ये गोडसे हे गंभीर जखमी झाले. साऱ्या पाठीवर मारहाणीचे वळ उठले. जखमी अवस्थेत ते स्वत: शासकीय रुग्णालयात दाखल झाले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात मुलगा आणि पत्नीच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा आशिष गोडसे आणि पत्नी रेखा गोडसे यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. निवृत्त पोलिस अधिकारी गोडसे यांनी सांगितले की, मुलगा इंजिनिअर असून एकुलता एक आहे.