साताऱ्यात राष्ट्रवादीला दे धक्का, आमदार शशिकांत शिंदेंचा 1 मताने पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 09:01 AM2021-11-23T09:01:19+5:302021-11-23T09:13:03+5:30
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावली विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती.
मुंबई - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटी मतदारसंघासाठी सातारा येथे शांततेत मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेत ४१६ पैकी ३९७ मतदारांनी सहभाग नोंदवला. या मतदानाची टक्केवारी ९५.४३ टक्के इतकी असून या मतांची मोजणी आज मंगळवार सकाळी (ता. २३) साताऱ्यात होत आहे. सकाळी हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांचा 1 मताने धक्कादायक पराभव झाला आहे. या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवला. ज्ञानदेव रांजणे यांनी जावळीतून ही निवडणूक लढवली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावली विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. यावेळी पोलिसांच्या उपस्थितीतच एकमेकांना अपशब्द वापरणे पर्यंत मजल गेली होती. मोठा अनर्थ व्हायच्या आधीच आमदार शिंदे आणि रांजणे यांनी मध्यस्थी करून समजुतदारपणा दाखवला आणि वाद मिटवला.
जिल्हा बँकेच्या जावळी मतदारसंघासाठी एकूण 49 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यापैकी शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून 25 मतं घेत रांजणेंनी विजय मिळवला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून पहिला निकाला हाती आला. त्यामध्ये, आमदार शशिकांत शिंदेंचा पराभव झाला आहे.
१0 संचालक बिनविरोध
या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. पक्षविरहित बँकेची वाटचाल यापुढेही कायम तशीच राहावी, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चा, परस्पर सामंजस्याने निवडणूक टाळण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनांमुळे निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. पहिल्याच टप्प्यात आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह १० संचालक बिनविरोध निवडून आले.