मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आप्पा मांढरेंवर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 01:39 PM2022-12-26T13:39:35+5:302022-12-26T13:39:46+5:30
मुख्य सूत्रधारासह साथीदाराला अटक; अल्पवयीन मुलांना कटात केले सहभागी
सातारा : येथील मांढरे आळीतील आप्पा मांढरे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह एकाला पुण्यातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या संशयितांना आप्पा मांढरे यांचा खून करायचा होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजवाड्यावरील गोलबागेजवळ ९ नोव्हेंबर रोजी रात्री दीपक उर्फ आप्पा मांढरे (रा. मांढरे आळी, सातारा) यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये मांढरे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अद्यापही पुणे येथे उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीस व दोन अल्पवयीन मुलांना १० नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याचे साथीदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र, हे आरोपी पुणे येथे असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी पुणे येथे जाऊन मुख्य सूत्रधार ऋृषभ राजेंद्र जाधव (वय २५, रा. रविवार पेठ, सातारा), त्याचा साथीदार चंद्रकुमार मारुती निगडे (वय २५, रा. पाटखळमाथा, वाढे, सातारा) याला अटक केली.
२०१७ मध्ये मंगळवार तळे परिसरात अक्षय वाघमळे या तरुणाचा खून झाला होता. अक्षय हा या संशयित आरोपींचा मित्र होता. त्याच्या खुनाला आप्पा मांढरे हे कारणीभूत आहेत, असा त्यांचा राग होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी संशयितांनी आप्पा मांढरे यांचा खून करण्याचा कट रचला होता. या संशयितांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व दुचाकी जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, हवालदार लैलेश फडतरे, पोलिस नाईक अमित माने, ओंकार यादव, स्वप्निल कुंभार यांनी केली.
अल्पवयीन मुलांच्या हातून करायचा होता खून
अल्पवयीन मुलांना या कटात सहभागी करून घेण्यात आले. या मुलांच्या हातून खून झाला तर आपण सहिसलामत सुटू, असे मुख्य सूत्रधाराला वाटत होते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे त्यांनी अल्पवयीन मुलांना गोळीबार करायला लावला. पण यातून आप्पा मांढरे वाचले.