समर्थ मंदिर येथे दुकानाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:28 AM2019-04-23T10:28:38+5:302019-04-23T10:29:25+5:30
सातारा येथील समर्थ मंदिर परिसरात असलेल्या दुकानाची दहा ते बाराजणांनी तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सातारा : येथील समर्थ मंदिर परिसरात असलेल्या दुकानाची दहा ते बाराजणांनी तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रशांत मनवे (वय २७, रा. मनवेवाडी, ता. सातारा) याने गेल्या काही महिन्यांपूर्वी समर्थ मंदिर येथे घरगुती वस्तूंचे नवे दुकान सुरू केले आहे. या दुकानामध्ये विजय भोसले (रा. डबेवाडी, ता. सातारा) हा काम करतो. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दुकान उघडल्यानंतर हातात हॉकी स्टिक घेऊन दहा ते बारा युवक तेथे आले.
संबंधित युवकांनी दुकानात घुसून दुकानातील साहित्यांची तोडफोड केली. तसेच साहित्य दुकानातून बाहेर फेकले. या प्रकारानंतर संबंधित युवक तेथून पसार झाले. या प्रकाराची माहिती प्रशांत मनवे याला मिळाल्यानंतर त्याने दुकानात धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता हल्ला करणारे संबंधित युवक एका ट्रेडिंग कंपनीतील कामगार असल्याचे त्याने ओळखले.
याची पोलिसांना त्याने माहितीही दिली असून, जाबजबाब घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिसांनी सुरू केली.