गावोगावच्या पाण्याच्या टाक्या बनल्या शोपीस!

By Admin | Published: July 27, 2015 11:01 PM2015-07-27T23:01:51+5:302015-07-27T23:01:51+5:30

येरळवाडी पाणीपुरवठा योजना बंद : औंधसह एकवीस गावांमधील स्थिती; लाखो रुपये पाण्यात

Shopped water tanks of the villages! | गावोगावच्या पाण्याच्या टाक्या बनल्या शोपीस!

गावोगावच्या पाण्याच्या टाक्या बनल्या शोपीस!

googlenewsNext

औंध : औंधसह २१ गावांसाठी दुष्काळी भागातील जनतेसाठी सुरू केलेली येरळवाडी मध्यम प्रकल्पाची नळ पाणीपुरवठा योजना १९९९ साली सुरू झाली. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून ही योजना थकबाकी, अनियमितता यामुळे योजना बंद असून प्रत्येक गावात लाखो रुपये खर्चून बांधलेल्या पाण्याच्या टाक्या शोपीस बनल्या आहेत. या योजनेत औंधसह निमसोड जायगाव म्हासुर्णे, नांदोशी, खबालवाडी, गणेशवाडी, गोसाव्याची वाडी, नागाचे कुमठे, गोपूज, पळशी, खरशिंगे, होळीचे गाव, सिद्धेश्वर कुरोली, वरुड व अन्य सहा गावांचा समावेश करण्यात आला होता. या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे या गावांना पाणीटंचाईपासून सुटका मिळाली होती. निदान आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला, यामुळे गावातील दुष्काळी जनता फार खुश होती. परंतु मागील काही वर्षांपासून या योजनेला घरघर लागल्याने औंधसह २१ गावांतील लोकांचा मोठा भ्रमनिरास झाला. यामुळे पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू झाली आहे.ही योजना बंद झाल्यापासून काही गावांनी आपल्या गावासाठी स्वतंत्र पाणीयोजना मंजूर करून आणली. तर काही गावांनी आपल्या गावातील जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेला संजीवनी दिली. यामुळे यातून काही गावे पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाली.सद्य:स्थितीत अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांनी या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने या येरळवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पाण्याच्या टाक्या पाईपलाईन मोटारी धूळखात पडल्या आहेत. औंध परिसरातील अनेक गावे, वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईस सोमोरे जावे लागत आहे. लाखो रुपयांची प्रत्येक गावांची असलेली थकबाकीवर शासन पातळीवर तोडगा काढून ही योजना सुरू व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)

करवसुली होता होईना...
पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावोगावच्या ग्रामपंचायतीने कर वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. अगोदर नळाला पाणी येऊ दे, मग पाणीपट्टी मागा, असे ग्रामस्थांकडून सुनावले जात आहे, त्यामुळे करवसुली होता होत नाही.
बोअरवेलची संख्या वाढली
येरळवाडी पाणीपुरवठा योजना बंद झाल्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. गावोगावी लोकांनी आपापल्या वाड्या-वस्त्या, भावकी यामध्ये सामाईक बोअरवेल घेतल्या आहेत, तर काही लोकांनी घरटी बोअरवेल घेतल्या असून वैयक्तिक पाणीप्रश्न सोडविला आहे.

Web Title: Shopped water tanks of the villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.