रेशनिंगसाठी दुकानदारांचा कऱ्हाडात मोर्चा
By admin | Published: February 10, 2015 10:23 PM2015-02-10T22:23:44+5:302015-02-10T23:57:33+5:30
हजारोंचा सहभाग : दुकानदारांसह लाभधारक महिलांची लक्षणीय उपस्थिती
कऱ्हाड : ‘आमच्या मागण्या पूर्ण करा; रॉकेल-धान्य चालू करा’ अशी घोषणाबाजी करीत रॉकेलची रोख सबसिडी तत्काळ रद्द करून बायोमेट्रीक पध्दत बंद करावी, अशा अकरा मागण्यांसाठी मंगळवारी कऱ्हाड येथे स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्रे ते संघटनतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांसह हजारो लाभधारक नागरिक सहभागी झाले होते.
आॅल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व पुण्यातील रॉकेल परवानाधारक महासंघ व कऱ्हाड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसह तालुक्यातील गावागावातून आलेल्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला. पंचायत समितीपासून सकाळी ११.३० वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. दत्तचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा दत्त चौकातून भेदा चौकात व तेथून स्थलांतरित झालेल्या मार्केट यार्डमधील तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. संघटनेचे राज्याध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब तोडकरी, तालुका अध्यक्ष व मोर्चाचे मुख्य संयोजक अशोकराव पाटील, उपाध्यक्ष के.एम.पवार, खजिनदार सुरेश पाटील, शंकर रामुगडे, तुकाराम देसाई, सचिन इनामदार, प्रदीप शिर्के, वि. तु. सुकरे, बाळासाहेब पाटील आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
स्वस्त धान्य व रॉकेल विक्रेता संघटनेतर्फे निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांना एकूण १३ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रतिव्यक्ती रॉकेल कोटा २ लिटर मिळावा, शुभ्र कार्डधारकांना रॉकेल दिले जावे, रेशनकार्डवरील अनुदानाबदल्यात धान्य मिळावे, शासनाने रेशन धान्य दुकानामध्ये बसविण्यात येणारी बायोमेट्रीक पद्धतीचे यंत्र बंद करावे, २ गॅस सिलिंडर धारकांना रॉकेल दिले जावे, रेशनकार्डवरील साखर, पामतेल, डाळ, गहू, तांदूळ यासारख्या जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात, बी. पी. एल. व अंत्योदय कार्डवरील धान्य सुरू करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये केले जाणारे बदल याविषयी जनतेला माहिती देण्यात यावी, अशा मागण्या संघटनेद्वारे करण्यात आल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष अशोक पाटील म्हणाले, ‘शासन कोणतेही असो परंतु जनतेचा आवाज हा त्या शासनाला जागे केल्याशिवाय राहत नाही. या मोर्चातून सामान्य जनतेसाठी मोठा लढा उभा केला आहे. तो
तसाच पुढे चालू ठेवणार आहे.’ (प्रतिनिधी)
राज्यकर्त्यांनाच अच्छे दिन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिन आणतो, असे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या भुलभुलैय्याला भुलून सर्वांनी त्यांना निवडून दिले. मात्र, आता त्यांचेच अच्छे दिन आले असून आपल्याला बुरे दिन पाहायला मिळत आहेत, असे आप्पासाहेब गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले.
रणरागिणींचा आक्रमकपणा
ग्रामिण भागातील महिलांनी रेशनिंग धान्याबाबत आज आक्रमक पवित्रा घेतला होता. रानात मजुरीसाठी जाणाऱ्या महिला आज मात्र प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळाले. या महिलांनी शासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.