पालिकेच्या जागेवर दुकानदारांचे ‘पोट’भाडेकरू
By admin | Published: December 3, 2015 10:39 PM2015-12-03T22:39:06+5:302015-12-03T23:47:21+5:30
हॉकर्सची हतबलता : उदरनिर्वाहासाठी छोटा व्यवसाय करणाऱ्यांना गिळतायत काठावरचे मोठे मासे
दत्ता यादव - सातारा
सातारा : उन्हातान्हात रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या मागचे शुक्लकाष्ट काही संपता संपेनासे झाले आहे. पोलिसांच्या कारवाईचा बडगा सुरू असतानाच आता दुकानदारांच्या मनमानीपुढे उदरनिर्वाहासाठी छोटे-मोठे व्यवसाय करणारे विक्रेते अक्षरश: हतबल झाले असून, पालिकेच्या जागेवरच दुकानदारांनी चक्क ‘पोट’भाडेकरू ठेवल्याचे समोर आले आहे.
शहरात इनमीन राजपथ आणि कर्मवीरपथ हे दोन मुख्य रस्ते आहेत. हे दोन रस्ते रहदारीचे असल्यामुळे या रस्त्यावर अनेक छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी आपला व्यवसाय थाटला आहे. गाळा भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू करणे, अशा विक्रेत्यांना न परवडणारे असते. त्यामुळे रस्त्यावर बसून व्यवसाय करणे, हे विक्रेते पसंत करत असतात. मात्र, रस्त्यावरही आता विक्रेत्यांना जागा मिळेनासी झाली आहे. जागा मिळालीच तर ज्या दुकानासमोर विक्रेते बसत आहेत. त्या दुकानदाराला महिन्याला भाड्यापोटी पाच ते सात हजार रुपये द्यावे लागत आहेत. शिवाय पालिकेची दिवसाची पावती सुमारे २५ रुपये फाडावी लागत आहे. अशा प्रकारे या हॉकर्सना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. पालिकेच्या जागेवरच दुकानदारांनी ‘पोट’भाडेकरू ठेवल्याने काठारचे मासे मोठे झाले आहेत. तर हतबल झालेले हॉकर्स मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत.
जर ‘पोट’भाडेकरू विरोधात आवाज उठवलाच तर मग दुकानासमोर बसू दिले जाणार नाही, याचीही विक्रेत्यांना धास्ती वाटतेय. त्यामुळे गपगुमानं दुकानदारही खूश आणि पालिकाही खूश ठेवण्याचा विक्रेते खटाटोप करत आहेत. काही ठिकाणी दुकानापेक्षा रस्त्यावर चांगला व्यवसाय होत असतो. त्यामुळे दुकानदाराला रस्त्यावर बसण्याचे भाडे दिले तरी चालेल, अशीही काही विक्रेत्यांची मानसिकता झाली आहे.