दिवाळीच्या खरेदीसाठी अखेर बाजार पेठ फुलली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 10:31 PM2017-10-11T22:31:42+5:302017-10-11T22:31:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दिव्यांचा उत्सव आणि वर्षातला मोठा सण असलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी साताºयातील बाजारपेठ फुलली आहे. कपड्यांच्या दुकानांबरोबरच फराळाचे साहित्य, किल्ल्यावर ठेवायला खेळणी, पणती याबरोबरच घरगुती उपकरणे खरेदीसाठी सातारकरांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले आहे.
दिवाळीच्या स्वागतासाठी गत सप्ताहापासून सातारनगरी सज्ज झाली होती. कपडे व्यापाºयांनी दिवाळीचा ट्रेन्ड बघून त्यानुसार आधुनिक स्टाईलचे पेहराव बाजारपेठेत आणले आहेत. मात्र, शाळेला सुटी लागल्यानंतरच कपडे बाजारपेठ फुलणार, असा कयास व्यापारी व्यक्त करीत आहेत. शहरातील गोल बाग परिसरात पणत्या विक्रेते दाखल झाले आहेत. विविध आणि आकर्षक आकारातील पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तीस रुपये डझनपासून पणत्या बाजारात उपलब्ध आहेत.
दिवाळीच्या तिथीवर घरात आवश्यक असणाºया उपकरणांच्या बुकिंगसाठीही बाजारात सातारकरांची गर्दी दिसत आहे. वॉटर प्युरिफायर, आटा चक्की, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, फ्रीज आदी घरगुती वस्तूंच्या पूर्व नोंदणीसाठीही गर्दी पाहायला मिळत आहे. किल्ल्यावर आवश्यक असलेली खेळणीही बाजारात दाखल झाली आहेत. शिवाजी महाराजांसह, जिजाऊ, संताजी-धनाजी, शिपाई, गवळणी मातीपासून तयार करण्यात आल्या आहेत.
अभ्यासानंतर किल्ला
बांधणीकडे लक्ष
शाळेत परीक्षा सुरू असल्यामुळे मुलं लवकर घरी येत आहेत. किल्ला तयार करण्यासाठी अभ्यासातून ही मुलं सूट मिळवत किल्ला बनविण्यासाठी धडपडत आहेत. रोज एक-एक वस्तू करत किल्ला बांधणीचे साहित्य मुलांनी आणले आहे. परीक्षेचा अभ्यास झाल्यानंतर मिळणाºया थोड्या वेळेतच सध्या किल्ला बांधणीचे दिव्य मुलांना पार पाडावे लागत आहे.