मलकापुरात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात खरेदीसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:37 AM2021-04-15T04:37:50+5:302021-04-15T04:37:50+5:30
मलकापूर : राज्य शासनाने बुधवारी रात्रीपासून कडक लाॅकडाऊन जाहीर केल्यामुळे मलकापुरात सकाळपासूनच खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दिसेल त्या ...
मलकापूर : राज्य शासनाने बुधवारी रात्रीपासून कडक लाॅकडाऊन जाहीर केल्यामुळे मलकापुरात सकाळपासूनच खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दिसेल त्या दुकानात नागरिक जाऊन खरेदी करत होते. तर कराड-ढेबेवाडी मार्गावर मंडईत खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला होता.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासनाने मोठा निर्णय घेतला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. लॉकडाऊनची घोषणा होताच मलकापुरात बुधवारी सकाळपासूनच साहित्य घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले होते. मिळेल त्या दुकानात नागरिक पोहोचत होते. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात एकच झुंबड उडाली होती. यावेळी छोट्या छोट्या बझारसह दुकानातूनही गर्दी झाली होती. गर्दीला आवरताना दुकानदारांना चांगलीच कसरत करावी लागली. रांगेत येणाऱ्यांना व एका वेळेस पाच नागरिकांनाच प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे काही ठिकाणी दुकानाच्या प्रवेशद्वारावरच गर्दी झाली होती. तसेच दुकानांसमोर लांब रांगा लागल्या होत्या. तर कराड-ढेबेवाडी मार्गावर मंडईत खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. असे असतानाही गांभीर्य नसल्यासारखे अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
फोटो आहे...