मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सलून दुकाने बंद, सातारा, फलटणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:06 PM2017-11-18T12:06:03+5:302017-11-18T12:08:54+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड येथील भीमाशंकर साखर कारखाना गळित हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या विधानामुळे नाभिक समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या विधानाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याला सातारा, फलटणमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड येथील भीमाशंकर साखर कारखाना गळित हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या विधानामुळे नाभिक समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या विधानाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याला सातारा, फलटणमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन दुकाने बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यामध्ये म्हटले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.
याचा निषेध म्हणून शनिवारी एक दिवस दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक समाजबांधवांची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
वीर जिवाजी नाभिक समाज संघटनेचे सातारा शहराध्यक्ष संतोष साळुंखे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष भानुदास वास्के, शंकर दळवी यांनी केलेल्या आवाहनाला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ग्राहकांना आंदोलनाची माहिती व्हावी, व त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक दुकानांमध्ये शुक्रवारीच सूचना फलक लावले होते. खटाव तालुक्यातील मायणी येथे शुक्रवारीच बंद पाळण्यात आला होता.