दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:24+5:302021-04-21T04:39:24+5:30
सातारा : राज्य शासनाने ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत किराणा माल व अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी सात ते अकरा ...
सातारा : राज्य शासनाने ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत किराणा माल व अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ही दुकाने बंद होणार असली तरी या दुकानांमधून सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीमध्ये घरपोच पार्सल सेवा करता येणार आहे, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारी दिले.
या आदेशानुसार सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, आदी सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पन्नाशी निगडित दुकाने ही सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, या दुकानातून सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरपोच सेवा सुरू राहणार आहे.
याव्यतिरिक्त वृत्तपत्रांचे वितरण सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत घरपोच सेवा सुरू राहील, तर स्टॉलवरील विक्री सकाळी सात ते अकरा या कालावधीत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.