Satara: रंगोत्सवावेळी बंदुकीतून हवेत गोळीबार, तिघांवर गुन्हा; कऱ्हाड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:51 PM2024-04-01T12:51:11+5:302024-04-01T12:51:32+5:30
कऱ्हाड : गावच्या यात्रेवेळी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार करण्यात आला. जखीणवाडी (ता. कऱ्हाड) येथे शनिवारी सकाळी ८ वाजेच्या ...
कऱ्हाड : गावच्या यात्रेवेळी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार करण्यात आला. जखीणवाडी (ता. कऱ्हाड) येथे शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
योगेश तानाजी थोरात, अधिकराव निवृत्ती पवार, वसंत दाजी पाटील (सर्वजण रा. जाखीणवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील जखीणवाडी येथे रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो. यावेळी गावातून बैलगाड्या पळविल्या जातात. या यात्रेला विभागात मोठे महत्त्व आहे. शनिवारी सकाळीही परंपरेनुसार गावात रंगोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, उत्सव सुरू असतानाच हवेत गोळीबार झाल्याचा आवाज काही पोलिस कर्मचाऱ्यांना आला. त्यांनी शोध घेतला असता तिघांनी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारीही त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी हवेत गोळीबार करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्याकडील बारा बोअरची बंदूकही पोलिसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील अधिक तपास करीत आहेत.