असावा सुंदर; पण सुरक्षित बंगला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:50 AM2021-06-16T04:50:15+5:302021-06-16T04:50:15+5:30

कऱ्हाड : कडी-कुलुपात ठेवलेली मालमत्ता सध्या सुरक्षित राहिलेली नाही. फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही पैसा आणि दागिने बंद घरातून ...

Should be beautiful; But safe bungalow! | असावा सुंदर; पण सुरक्षित बंगला!

असावा सुंदर; पण सुरक्षित बंगला!

Next

कऱ्हाड : कडी-कुलुपात ठेवलेली मालमत्ता सध्या सुरक्षित राहिलेली नाही. फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही पैसा आणि दागिने बंद घरातून लंपास केले जातायेत. त्यामुळे सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना कराव्या लागत आहेत. मात्र, काही जण लाखोची मालमत्ता शंभर रुपयांत मिळणाऱ्या कुलुपाच्या भरवशावर ठेवतात. आणि याच कमकुवत कुलुपांमुळे चोरट्यांचं ‘काम’ हलकं होतंय.

कऱ्हाड शहरासह उपनगरांत घरफोडीच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी वाखाणातील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला. घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांंची झोप उडाली आहे. चोरी करण्यासाठी सराईत चोरटे विविध क्लृप्त्या लढवितात.

कुलुपाची बनावट चावी तयार करणे चोरट्यांना सहजशक्य नसते. त्याचबरोबर दरवाजा फोडणे किंवा छताचा पत्रा उचकटण्याचा प्रयत्न करताना मोठा आवाज होण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे चोरटे कुलूप कटावणीने उचकटून घरात प्रवेश करण्याचा सर्रास प्रयत्न करतात. त्यातच कुलूप हलक्या प्रतीचे असेल तर ते चोरट्यांना फायदेशीर ठरते. कटावणीवर हलकासा दाब दिला तरी हलक्या प्रतीचे कुलूप लगेच तुटते. याचाच गैरफायदा चोरट्यांकडून घेतला जातो.

- चौकट

कपाटात ऐवज; घराला कुलूप

बहुतांश नागरिक किमती ऐवज व लाखोंची रोकड घरामध्ये ठेवतात. कपाटातच अशा वस्तू हमखासपणे ठेवल्या जातात. आणि दरवाजाला फक्त कुलूप लावले जाते. लाखोंचा ऐवज फक्त एका कुलुपाच्या भरशावर असतो; पण असे असताना संबंधित कुलुपाच्या दर्जाबाबत म्हणावे तेवढे गांभीर्य दाखविले जात नाही.

- चौकट

घर कसं होईल सुरक्षित..?

१) ‘इलेक्ट्रॉनिक सेक्युरिटी सिस्टम’ वापर करावा.

२) दरवाजाचे कुलूप चांगल्या दर्जाचे असावे.

३) आवश्यकतेपेक्षा जास्त किमती ऐवज घरामध्ये ठेवू नये.

४) किमती ऐवज बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावा.

५) दरवाजाच्या बाहेर लोखंडी ग्रीलचा दरवाजा बसवावा.

६) घर जास्त दिवस बंद राहणार असेल तर शेजाऱ्यांना सांगावे.

७) घराबाहेर तसेच हॉलमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी.

लाखोंचा ऐवज लंपास

कऱ्हाड शहरासह उपनगरांमध्ये गत वर्षभरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. बंगले, फ्लॅट व दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रोख रकमेसह दागिन्यांवरही त्यांनी डल्ला मारला आहे.

- कोट

कऱ्हाड परिसरात गस्त वाढविली आहे. चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू असून रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांची माहितीही संकलित केली जात आहे.

- बी. आर. पाटील

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कऱ्हाड

- चौकट

उपनगरे ‘हिटलिस्ट’वर

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरासह मलकापूर, आगाशिवनगर, विद्यानगर, सैदापूर व ओगलेवाडी या उपनगरांमध्ये घरफोडीच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. गत वर्षभरात झालेल्या घरफोड्यांपैकी बहुतांश घरफोड्या मलकापूर व विद्यानगर परिसरात झाल्याचे पोलीस रेकॉर्डवरून स्पष्ट होते.

- चौकट

बंद बंगला, फ्लॅट ‘टार्गेट’

घरफोडीच्या घटनांची पोलीस दप्तरी नोंद केली जात असताना दिवसा व रात्री या दोन प्रकारामध्ये ती केली जाते. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत वर्षभरात दिवसा झालेल्या चोरीच्या घटनांची संख्या जास्त आहे. चोरटे बंद फ्लॅट आणि बंगला हेरून त्या ठिकाणी डल्ला मारीत आहेत.

Web Title: Should be beautiful; But safe bungalow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.